२०१५ पासून प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत, महाराष्ट्र प्रशिक्षण देण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण नोकरी देण्यात ११व्या क्रमांकावर आहे. १३ लाख ३१ हजार लोकांना प्रशिक्षण दिले पण त्यातील फक्त ८० हजार लोकांना नोकरी देण्यात यश आले. म्हणजे १०% बेरोजगारांनाही हे सरकार नोकरी देऊ शकले नाही हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली.
जयंत पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काही आकडेवारी समोर आणत म्हणाले की, आपला महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राज्य राहिला आहे. पण २०१४ पासून मधला अडीच वर्षांचा काळ सोडला तर राज्यात ८ वर्ष तथाकथित डबल इंजिन सरकार आहे. आता तिसरं इंजिनही जोडले गेले आहे. पण राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यात हे इंजिन फेल झाले आहे असा आरोपही केला.
शेवटी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, दरवर्षी अख्खं मंत्रिमंडळ दावोसला जातं, इतक्या सामंज्यस करारावर MoU वर सह्या झाल्या, इतका रोजगार मिळणार अशा बातम्या पीआर करून छापल्या जातात, पण प्रत्यक्षात रोजगार निर्माण होत नाही. यंदा सांगितले गेले होते, १५ लाख ९८ हजार नोकऱ्या दिल्या जातील. कुठे आहेत त्या नोकऱ्या? असा प्रश्न उपस्थित करत जयंत पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात युवकांसाठी नोकरी निर्माण करण्याची अत्यंत गरज आहे. पण महायुतीच्या काळात सरकार इतर गोष्टींवर अधिक लक्ष देत आहे. सरकारने इंफ्रास्ट्रक्चरवर लक्ष देणे गरजेचे आहेच, पण सोबतच रोजगार निर्माण होतील अशा इन्हेस्टमेंट investment वाढविण्यावर अधिक भर देणे महाराष्ट्राची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.
Marathi e-Batmya