जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालकासोबत सहाय्यकची (क्लिनर) गरज नाही मोटार वाहन कायदा, १९८८ अन्वये मसुदा अधिसूचना जारी

जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी चालका सोबत सहाय्यकची (क्लिनर ) गरज लागणार नाही, या बाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर २९ ऑगस्टपर्यंत सर्वसामान्यांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत.अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्यातील जड मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनधारक संघटनांनी केलेल्या आंदोलनात चालकांसोबत सहाय्यक (क्लिनर) देण्याची अट शिथिल करण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली होती. त्यांच्या मते सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वाहन निर्मिती होत असल्यामुळे सहाय्यकाची (क्लिनर)  शक्यतो गरज पडत नाही. त्यामुळे त्याचा विनाकारण खर्च वाढतो. तो खर्च कमी करण्यासाठी चालकासह सहाय्यक देण्याची अट शिथिल करण्यात येत आहे.*

महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ९६ (२) (xxxii) अन्वये शासनाला दिलेल्या अधिकारांनुसार या नियमांचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला असून, २९ ऑगस्ट २०२५ नंतर शासनाकडून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.

या मसुद्यावर कोणत्याही व्यक्तीने हरकती किंवा सूचना असल्यास त्या परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, ५ वा मजला, फाउंटन टेलिकॉम बिल्डिंग, क्र. २, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१ येथे पाठवाव्यात. नियोजित तारखेपूर्वी प्राप्त झालेल्या हरकती व सूचना शासनाच्या विचारार्थ घेतल्या जातील.

मसुदा नियम

१. हे नियम महाराष्ट्र मोटार वाहन (प्रथम सुधारणा) नियम, २०२५ म्हणून ओळखले जातील.

२. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम २४९ मध्ये खालील तरतूद जोडण्यात येईल:

जड मालवाहतूक वाहनामध्ये (Heavy Goods Vehicle) सहाय्यक (attendant) असणे बंधनकारक राहणार नाही, परंतु ही सवलत केवळ अशा वाहनांसाठी लागू राहील जे ड्रायव्हर असिस्ट सिस्टीम (Driver Assist System) ने सुसज्ज असतील.

ड्रायव्हर असिस्ट सिस्टीममध्ये ३६० अंश दृश्य कॅमेरा, सर्व ब्लाइंड स्पॉट व मागील भागाचे थेट दृश्य (live feed) उपलब्ध करून देणारी सुविधा, तसेच ध्वनी आणि दृश्य स्वरूपात इशारे देणारी प्रॉक्सिमिटी अलार्म प्रणाली असणे आवश्यक आहे.

ही प्रणाली वाहन रिव्हर्समध्ये असताना मागून येणाऱ्या वाहनचालकांना व इतर रस्त्यावरील वापरकर्त्यांना पुरेशी पूर्वसूचना देईल व चालकाला सुरक्षिततेसाठी आवश्यक इशारे देईल.

ही अधिसूचना राज्यातील सर्व वाहनधारक, वाहतूक व्यवसायिक व सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीसाठी प्रकाशित करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेला अध्यादेश खालीलप्रमाणे

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्यात मतदार याद्यांची विशेष पुनरीक्षण मोहीम (SIR) निष्पक्षपणे राबवा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन काँग्रेस शिष्टमंडळाची मागणी

निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणारी विशेष पुनरीक्षण मोहिमेवर (SIR) अनेक राज्यातून चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. जाणीवपूर्वक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *