काल सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्तावर उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली. तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्या कार्यालयाकडून अद्याप प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या सगळ्या घडामोडीत शरद पवार यांच्या पक्षातून बाहेर पडत स्वतंत्र सवतासुभा मांडणारे अजित पवार यांना याबाबत विचारले असता अजित पवार यांनी मोजकी प्रतिक्रिया देत त्यांच्या पक्षात त्यांनी काय करावे असे सांगितले.
अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असल्याने जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी पुणे येथे एका बैठकीस उपस्थित होते. त्यावेळी यासंदर्भात अजित पवार यांना या संदर्भात विचारणा करण्यात आली.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत. आम्ही दोघांनी अनेक वर्षे एकत्र काम केले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, आर आर पाटील असे आम्ही सर्वजण ९० च्या बँचचे. आता आमची आमदारकीची आठवी टर्म आहे. इतके वर्ष एकत्र काम केल्याने आमचे चांगले संबध आहेत. पण माझी राजकिय भूमिका वेगळी आहे. हे जगजाहिर आहे.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, जयंत पाटील यांनी कोणत्या हेतूने राजीनामा दिला हे आपल्याला माहित नाही आणि ते विचारण्याचा अधिकार नाही. ते पुढच्या आठवड्यात अधिवेशनात भेटले तर सहज त्यांना याबद्दल त्यांना विचारेन. ते सहा सात वर्षापासून प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना इतरांना संधी देऊन कदाचित राष्ट्रीय पातळीवर जायचे असेल अशी शक्यताही यावेळी व्यक्त केली.
Marathi e-Batmya