प्रशांत परिचारक यांच्या बडतर्फीच्या मुद्यावरून शिवसेनेचा सभात्याग सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

विधान परिषदेतील भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीवरून शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला अडचणीत आणले. मात्र परिचारक यांच्या आमदारकीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीवरून विधानसभेत सभात्याग केला.

विधानसभेचे कामकाज सकाळी सुरु झाल्यानंतर प्रशांत परिचारक यांची आमदारकी बडतर्फ करण्याची मागणी करत त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परिचारक यांचे वक्तव्य हे सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा अपमान करणारे असून या वक्तव्याबाबत कठोरातील कठोर शिक्षा द्यायला पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी केली. यावेळी शिवसेनेचे सर्व आमदार अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येवून प्रशांत परिचारक यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण सुरु झाले.

अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रशांत परिचारक हे वरच्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतचा निर्णय येथे घेता येत नसल्याची बाब शिवसेनेच्या सदस्यांच्या नजरेस आणून दिली. मात्र तरीही शिवसेनेच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका न सोडल्याने अखेर विधानसभेचे कामकाज १५ मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.

त्यानंतर सभागृहाचे कामकाज  सुरु झाल्यानंतर सुनिल प्रभू यांनी परिचारक यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याबाबतचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष बागडे यांनी याप्रकरणी वरच्या विधान परिषदेच्या सभागृहात चर्चा सुरु आहे. तसेच ते त्या सभागृहाचे सदस्य आहेत. त्यामुळे त्याबाबतचा निर्णयही तेच घेतील असे सांगितले.

मात्र काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिचारक यांच्याबाबत सभागृहाच्या भावना तीव्र असून याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करत याप्रश्नावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकाच विचाराचे असल्याची भूमिका मांडली.

त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभेप्रमाणे विधान परिषदेचे सभागृहही स्वायत्त आहे. तेथे या विषयावर चर्चा करण्यात येत असून याबाबत निर्णय होईल. त्यामुळे आपल्याला त्यांच्या स्वायत्ततेवर अतिक्रमण करता येणार नसल्याचे सांगत प्रशांत परिचारक हे विधान परिषदेचे सदस्य असल्याची बाब नजरेसमोर आणून दिली.

मुख्यमंत्र्यांचे उत्तर संपताच सुनिल प्रभू यांनी परिचारक यांच्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचा आरोप करत सर्व शिवसेना सदस्य सभात्याग करत असल्याचे जाहीर करत सदनातून बाहेर पडले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदी पनौती तर मुख्यमंत्री फडणवीस खोटारडे, पेट्रोल डिझेल आहे तर पंपावर रांगा कशासाठी ? पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे दादरमध्ये मोठे आंदोलन व रास्ता रोको

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *