लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत शिक्षक भारती संघटनेचे प्रमुख तसेच जनता दल संयुक्तचे प्रदेशाध्यक्ष कपिल पाटील यांनी जनता दल संयुक्तचा राजीनामा देत नव्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना केली. मात्र आता स्वतःच स्थापन केलेल्या पक्षाचा त्याग करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सतेज बंटी पाटील आदी उपस्थित होते.
समाजवादी गणराज्य पक्षाच्या स्थापनेवेळी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलावत विशेष कार्यक्रम केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी समाजवाद आणि गणतंत्र लोकशाहीत किती महत्वाचे आहे या विषयी भाष्य करत गणतंत्र राखण्याचे महत्व अधोरेखित केले होते. त्यावेळी शिवसेना उबाठा आणि समाजवादी पक्षाचे अनेक जुने कार्यकर्त्ये आणि विचारधारेवर श्रद्धा असणारे अनेक जण उपस्थित होते. तसेच या नव्या पक्षाच्या स्थापनेबद्दल आणि नव्या वैचारिक युतीसाठी कपिल पाटील आणि उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले होते.
मात्र लोकसभा निवडणूकीला काही महिन्यांचा अवधी लोटत नाही तोच कपिल पाटील यांनी समाजवादी गणराज्य पक्षाचा त्याग करत आज काँग्रेस पक्षाता प्रवेश केला. वास्तविक पाहता कपिल पाटील हे अनेक वर्षे अपक्ष म्हणूनच वावरत होते. मात्र मुंबईसह राज्यात त्यांच्या शिक्षक भारती आणि छात्र भारतीच्या संघटनेच्या अनेक कार्यकर्त्ये आहेत.
काँग्रेसचे मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळापासून कपिल पाटील यांना विधान परिषदेसाठी काँग्रेस पुरस्कृत उमेदवारी देत त्यांना विधान परिषदेवर पाठविले जात असत. मात्र आज कपिल पाटील यांनी काँग्रेस पक्षातच अधिकृत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या सोहळ्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील केदार, सतेज पाटील उपस्थित होते.
Marathi e-Batmya