शरद पवार म्हणाले की, मोदी यांनी सर्वपक्षिय बैठक बोलवावी पंतप्रधानांनी केलेल्या घोषणांमुळे अस्वस्थेचे वातावरण

मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी (@narendramodi) यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय-प्रक्रिया राबविणे देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. यासोबतच पंतप्रधानांनी देशातील नामवंत अर्थतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा. पुढील धोरणांबाबत व्यापक विचारविनिमय करावा. देशातील जनतेमध्ये विश्वास आणि स्थैर्य निर्माण करणे, यालाच सद्यस्थितीत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका असल्याचे सांगितले.

पंतप्रधानांचे आदेश शीर्ष मानून सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करावी-जयंत पाटील

पंतप्रधान महोदयांचा आदेश शीर्ष मानून आपणही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करावी, फक्त एक गाडी आणि एक अंगरक्षक देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली.

आखाती देशातील युद्धामुळे आपल्या देशावर भविष्यात उद्भवणारे संकट टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले होते. यावर आता विविध मान्यवरांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंतराव पाटील यांनीही या आवाहनावर प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांनी केलेले प्रत्येक आवाहन मध्यमवर्गीयांनी कर्तव्य म्हणून पाळले. थाळ्या वाजवायला सांगितल्या… वाजवल्या. दिवे लावायला सांगितले तेही लावले. आता युद्धजन्य परिस्थितीत पेट्रोल, डिझेल आणि गॅस कमी वापरण्याचे आवाहन पंतप्रधान महोदयांनी केले आहे. मध्यमवर्गासाठी काटकसर ही काही नवी गोष्ट नाही. त्यामुळे कर्तव्य म्हणून याही वेळेला ते साथ देतीलच. पण २०-३० गाड्यांचा ताफा वापरणाऱ्या मंत्र्यांचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्या राज्यात मुख्यमंत्र्यांपासून मंत्री, अधिकारी आणि हल्ली तर सत्ताधारी पक्षाचे आमदार डझनभर गाड्यांचा ताफा आणि सुरक्षा घेऊन फिरतात. प्रधानमंत्री महोदयांचा आदेश शीर्ष मानून आपणही आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करावी, फक्त एक गाडी आणि एक अंगरक्षक देण्यात यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच… पण सत्ताधाऱ्यांनीही “राष्ट्र प्रथम” हे धोरण कृतीत उतरवावे असेही ते म्हणाले.

 

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची आरोप, भाजपाच्या राजवटीत गुन्हेगारांना अभय मिळत असल्यानेच पेपर लिक करणारे मोकाट नीट पेपर रद्द झाल्याने डॉक्टर बनण्याच्या लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा; भाजपा सरकारला एक परिक्षाही घेता येत नाही का?

भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व अनेक राज्यात आल्यापासून गुन्हेगारीने डोके वर काढले असून शिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *