सुप्रिया सुळे यांचा सवाल,… मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? सीबीएसई बोर्ड सुरु करण्यावरून राज्य सरकारला सवाल

राज्य सरकार राज्यातील शाळेमध्ये सीबीएसई सुरु करणार आहे मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचे काय होणार? यामुळे दक्षिण भारतात भाषेसाठी जे होते, ते योग्य आहे की काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारला केला.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, सीबीएसई बोर्ड राज्याच्या शाळांमध्ये सुरु होणार आहे. त्याबद्दल मला तीन प्रश्न विचारायचे आहे. सीबीएसई अभ्यासक्रमामध्ये किती टक्के मराठी असणार आहे. महाराष्ट्राचा इतिहास त्यात असणार का? महाराष्ट्राची किती माहिती त्यात असणार ?, सीबीएसई बोर्ड करताना तुमची तयारी आहे का? तुमच्याकडे शिक्षक आहेत का? सीबीएसईतून शिक्षण दिल्यावर मग मराठी भाषेचे काय होणार ? , राज्य शिक्षण मंडळ तुम्ही बंद करणार आहात का? अशी प्रश्नांची सरबतीच राज्य सरकारवर केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात क्राईम वाढत आहे. कधी चॅनल लावले की गुन्हेगारीच्या बातम्या दिसत आहेत. केंद्राच्या डेटातूनही राज्यात गुन्हेगारी वाढल्याचे दिसते. हा डेटा सरकारच पाठवते ना? महाराष्ट्रात इतकी अस्थिरता आणि इतकी गुन्हेगारी कधीच झाली नाही. ज्या व्यक्तीवर आरोप होतात, तो देश सोडून जातो. १९६ ईडीच्या केसेस दाखल झाल्या. त्यात दोनच जणांवर आरोपत्र सिद्ध झाले. हे केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केल्याचे सांगितले.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, राज्याचे अर्थमंत्री काल म्हणाले, सगळ्याचे सोंग घेता येते पण पैशांचे सोंग घेता येत नाही. अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्याचे मी स्वागत करते. मी हेच चार महिन्यांपासून सांगत होते. या सरकारने आता आदिवासी विभागाचे पैसे आणि सामाजिक विभागाचे पैसे वळवले आहे. तीन ते चार लाख कोटी रुपये शेअर बाजारातून लोकांनी काढून घेतले आहे. देशातील गुंतवणूक बाहेर जात आहे. सामान्य माणसांचे पैसे शेअर बाजारात होते. आज काय परिस्थिती आहे. मला या गोष्टी कळत आहे तर सरकारला का कळत नाही असा खोचक सवालही केला. परंतु सरकारकडून धुळफेक होत आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अतिशय वाईट आहे हे परवा अर्थमंत्र्यांनीच सभागृहात सांगितले आहे. त्यामुळे सरकारने औरंगजेबासारखे मुद्दे बाजूला करुन राज्यातून बाहेर जाणारी गुंतवणूक थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिक लक्ष द्यावे असे आवाहनही यावेळी केले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. असे गंभीर आरोप असलेला प्रशांत कोरटकर हा देश सोडून गेल्याची माहिती समोर आली आहे. हा माणूस देश सोडून गेलाच कसा, नागपूरवरुन दिल्लीला गेला आणि दिल्लीवरुन दुबईला गेला अशी माहिती मिळत आहे. राज्य सरकारला त्याला शोधता येत नसेल तर त्यांनी केंद्राची मदत घ्यायला पाहिजे, हे मी आधीही सांगितले होते आता पुन्हा सांगत आहे. एक माणूस नागपूरहून दिल्ली आणि दिल्लीतून बाहेर देशात निघून जातो तोपर्यंत राज्याचे पोलिस आणि गृहखातं काय करत होतं? असा सवाल ही यावेळी केला.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, सर्वाधिक गुन्हेगारी महाराष्ट्रात वाढली आहे. त्याबदद्दल सरकार बोलत नाही. सुसंस्कृत नागपूरमध्ये दंगल घडते, आज सहा दिवस झाले तरी नागपूरमधील अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू आहे. काय सुरु आहे या महाराष्ट्रात? असा सवाल करत या सरकारचे १०० दिवसांचे रिपोर्ट कार्ड पाहिले तर या सरकारने मागील १०० दिवसांत राज्यामध्ये फक्त क्राईम वाढवला, याशिवाय यांच्या रिपोर्टकार्डवर काहीही लिहिलेले नाही, अशी टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बीडमध्ये सरपंचाचे हत्याकांड झाले त्यानंतर परभणीमध्ये कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा पोलिस ठाण्यातील मारहाणीत मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमध्ये सर्वप्रथम शरद पवार त्या पीडित कुटुंबियांच्या भेटीला गेले. हे डिसेंबर मध्ये बीडलाही गेले आणि परभणीलाही गेले होते. शरद पवार डिसेंबरमध्ये जे बोलले होते, ते आज साडे तीन महिन्यांनी खरं होताना दिसत आहे. सरकारचे किती लोक बीड आणि परभणीला गेले? महादेव मुंडेंच्या पत्नीला सरकारचे किती लोक जाऊन भेटले? हा राजकारणाचा विषयच नाही, हा माणुसकीचा विषय आहे. बीड हत्यांकांडानंतर मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा नाही, यासाठी यांना आरोपीच सापडत नाही. असा अन्याय महाराष्ट्रात चालला आहे. आम्ही बीड, परभणी येथील अन्यायग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी डिसेंबरपासून आहोत. तोच स्टँड आमचा आजही आहे, असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, नगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण सालेकसामध्ये मतदान संपल्यावर १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान पण गुन्हा दाखल नाही

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *