सुप्रिया सुळे यांची माहिती, महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी पंतप्रधानांची भेट घेणार जंतर-मंतरवरील आंदोलनाची SIT चौकशी करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेतील सर्व आठही खासदार आम्ही महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी रीतसर वेळ मागून देशाच्या पंतप्रधानांची भेट घेणार आहोत. ते केवळ एका पक्षाचे पंतप्रधान नाहीत, तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीचे फोटोही आम्ही तुम्हाला नक्की देऊ असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांची संवाद साधताना सांगितले.

सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की,पंतप्रधान हे सगळ्या पक्षांच्या खासदारांना नियमितपणे भेटतात.आम्हीही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या मतदारसंघातील आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या कामांसाठी अधिकृतपणे सकाळी 11 वाजता पंतप्रधानांची भेट घेणार आहोत. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्यांना भेटून राज्याचे प्रश्न मांडणे हा आमचा अधिकार असल्याचे सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की,सध्या ज्या स्वरूपात हे बिल आणले जात आहे, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा स्पष्ट विरोध आहे.आमची सरकारला विनम्र विनंती आहे की हे बिल घाईघाईत मंजूर करू नका, ते मागे घ्या. जर तुम्हाला ते मागे घ्यायचे नसेल, तर ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवा. तिथे सर्व पक्षांचे नेते एकत्र बसून यावर चर्चा करतील. ड्रग मनी किंवा टेररिस्ट मनी असेल तर नक्कीच कारवाई करा, पण जर परदेशातून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी किंवा पोलियो इंजेक्शनसाठी निधी येत असेल, तर त्याला डर्टी मनी कसे म्हणता येईल? परदेशी निधीकडे नेहमी संशयाने आणि वाईट नजरेने पाहणे चुकीचे असल्याचे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की,विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेच्या गोंधळाबाबत आणि जंतर-मंतरवर आंदोलकांवर झालेल्या पॅलेट गनच्या हल्ल्याबाबत सत्य बाहेर आले पाहिजे. संसदेचे दरवाजे बंद करून आणि अश्रुधुराचा वापर करून आंदोलन कसे दडपले गेले, याची पारदर्शक एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कर्जमाफीबाबत या सरकारचा असंवेदनशीलपणा पाहून मला धक्का बसला आहे. लाडकी बहीण योजना आणि कर्जमाफी योजनेचे टायमिंग बघा.जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा हे सरकार दोन्ही हातांनी सवलतींचे निर्णय घेते, पण निवडणुका संपल्या की हात आखडते घेतात. देशासाठी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला कर्जमाफी देताना किचकट नियम आणि अटी का लादल्या जातात? पेपर फुटीच्या वेळी मात्र सरकारला कोणतेच नियम आठवत नाहीत असेही स्पष्ट केले.

शेवटी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या सुशिक्षित आणि तरुण पिढीला ना सीबीआयची भीती आहे, ना इडीची. त्यांना कुठलेही मोठे कॉन्ट्रॅक्ट नको आहे. ते संविधानाने दिलेल्या अधिकाराने केवळ आपला हक्क मागत आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी या नवीन पिढीचे कौतुक करून त्यांना ‘इमानदार’ म्हटले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. भागवतांनी तरुणांना दिलेले हे प्रमाणपत्र भाजपने ऐकले, तर मला जास्त समाधान वाटेल. जर सरकारने या तरुणांचा आवाज असाच दाबला, तर हे तरुण लवकरच सरकारला चले जावचा इशारा देतील असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

सुप्रिया सुळे यांचा सवाल, आयआयटी, आयआयएमची परीक्षा होते, तिथले पेपर का नाही फुटत? एमपीएससी MPSC विद्यार्थ्यांच्या विषय अतिशय गंभीर

एमपीएससी MPSC विद्यार्थ्यांच्या विषय अतिशय गंभीर आहे.,“मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, विषय अतिशय गंभीर आहे. एमपीएससी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *