जयंत पाटील म्हणाले, स्थगिती देणे म्हणजे ही राज्याची अधोगती

विद्यमान सरकारने पुढची कामे पूर्ण करायची असतात मात्र मागची कामे थांबवणे किंवा स्थगिती देणे म्हणजे ही राज्याची अधोगती आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना स्थगिती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

मागच्या वर्ष – दीड वर्षात जे निर्णय वेगवेगळ्या ग्रामपंचायतीसाठी किंवा महाराष्ट्रातील हजारो गावांना जो निधी दिला तो थांबवण्याचे काम जर या सरकारने केले तर त्या गावांची प्रगती थांबवली, प्रगतीत अडथळा निर्माण केला असा होतो असा थेट आरोपही करत जयंत पाटील पुढे म्हणाले, हे सरकार मागे बघायला लागले तर ते कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे या सरकारने मागे न बघता पुढचा विकास म्हणजे भविष्याकडे बघून चालावे असा सल्लाही दिला.

मागच्या वर्ष – दीड वर्षात झालेल्या कामांना वर्कऑर्डर दिली किंवा नाही दिली याच्या खोलात जाऊन आपला कालअपव्यय करण्यापेक्षा मागची कामे पूर्ण करावी आणि पुढची नवीन कामेही करायला काहीच अडचण नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एमआयडीसीतील भूखंड वाटपालाही स्थगिती दिली असून ती स्थगिती कोणत्या उद्देशाने दिली, त्यामागे कोणता हेतू होता हेही तपासले पाहिजे. कारण एखाद्या उद्योजकाला भूखंड दिला तर तो पटापट पुढची कामे करायला लागतो आणि राज्यातील लोकांना नोकर्‍या व रोजगाराची संधी मिळते याचे भान या सरकारला नाही असेही खडेबोल त्यांनी सुनावले.

एकतर फॉक्सकॉनसारखा प्रकल्प राज्याबाहेर घालवून यांनी वैचारिक दिवाळखोरी जाहीर केलेली आहे. गुजरातला गेलेल्या प्रकल्पाला थांबवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा उद्योगमंत्री यांनी केला नाही किंवा अनिल अग्रवाल यांना भेटून तो प्रकल्प परत आणण्याचा प्रयत्नही केला नाही. आता ज्या प्रकल्पांना भूखंड देण्यात आले त्या भूखंडानाच स्थगिती देणे म्हणजे उद्योजकांवर हे फार मोठे संकट आहे. त्यामुळे राज्य सरकारने असे वागू नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *