राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आदी उपस्थित

एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील मौजे सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील मौजे सदुंबरे (ता.मावळ) येथील तीन हेक्टर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

मौजे सदुंबरे येथील गायरानातील तीन हेक्टर जमीन एनडीआरएफला बाजारभावाने देण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यावर  या संस्थेने जनहित तथा राष्ट्रीय महत्त्व या कारणास्तव संस्थेस ही जमीन विनामूल्य मिळावी, अशी मागणी केली होती. या जमिनीवर  एनडीआरएफचा कायमस्वरूपी तळ उभारण्यात येणार आहे. जिथे आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध प्रशिक्षणांसह, विविध स्वरूपाच्या आपत्तींवर मात करण्यासाठीची कृतीदले तैनात राहणार आहेत. यामुळे राज्यात आपत्कालीन स्थितीत उपाययोजना करता येणार. या दृष्टीने देशातील एकमेव अशा समर्पित नागरी दल म्हणून एनडीआरएफला ही जागा विनामूल्य भोगवटादार वर्ग-2 म्हणून मान्यता देण्यात येणार आहे.

–००–

भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळ यांच्या नागपूर येथील जमीन भाडेपट्टयावरील मुद्रांक शुल्क माफ

मोझरी येथील अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळ यांच्या नागपूरमधील सुभाष रोड जागेच्या भाडेपट्ट्याच्या नुतनीकरणावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

मोझरी येथील अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळ ही सार्वजनिक धर्मादाय संस्था आहे. ही संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक प्रबोधन, ग्रामविकास, व्यसनमुक्ती, सर्वधर्मसमभाव, राष्ट्रभक्ती तसेच  विविध जनकल्याणकारी उपक्रम राबवीत असते. या संस्थेला नागपूर मधील सुभाष रोड येथील १८ हजार ३४० चौ.फूट जागा शासनाने १९५४ मध्ये भाडेपट्टयावर उपलब्ध करून दिलेली आहे. या संस्थेने विनंती केल्यानुसार भाडेपट्टयाच्या नुतनीकरणावरील मुद्रांक शुल्क लोकहितास्तव माफ करण्याचा प्रस्ताव होता. त्यास आज मान्यता देण्यात आली.

About Editor

Check Also

जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ शेवटची तीन महिन्यांची मुदतवाढ

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *