Eknath-Shinde-Ajit-Pawar-Together

एकनाथ शिंदे यांची भावनिक प्रतिक्रिया, एका डोळ्यात आनंद, दुसऱ्या डोळ्यात अश्रू… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या आठवणींची हुरहूर; "दादांची स्वप्ने पूर्ण करणे हीच दादांना खरी आदरांजली" – एकनाथ शिंदे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत त्यांना अभिवादन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचा आनंद आणि महायुतीचे शिल्पकार अजितदादा पवार यांच्या आठवणींचे दुःख, अशा संमिश्र भावनांनी आजचा दिवस भरून गेल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आजचा दिवस एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू घेऊन आला आहे. अजितदादांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. मात्र त्यांनी दाखविलेल्या विकासाच्या मार्गावर चालत सुखी, समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना बळ मिळो, हीच प्रार्थना, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीचे स्मरण करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते कसे ठेवावे, वक्तशीरपणा, दिवसातील प्रत्येक क्षण जनतेसाठी कसा खर्च करावा आणि प्रशासनावर प्रभावी पकड कशी ठेवावी, याचे धडे दादांनी संपूर्ण राजकीय पिढीला दिले. अर्थमंत्री म्हणून महायुतीच्या वचनपूर्तीसाठी त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प, शेती, शेतकरी आणि सहकार क्षेत्रावरील त्यांचा सखोल अभ्यास महाराष्ट्रासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील, असेही त्यांनी नमूद केले.

एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीची अनेक स्वप्ने आम्ही एकत्र पाहिली होती. मात्र नियतीने दादांना अकाली हिरावून नेले. त्यामुळे त्यांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करणे, हीच त्यांच्याप्रती खरी आदरांजली ठरेल.

आपल्या श्रद्धांजली संदेशाचा समारोप करताना शिंदे यांनी भावपूर्ण ओळींमधून अजितदादांच्या स्मृतींना उजाळा दिला.

एकनाथ शिंदे शेवटी म्हणाले की, दिवस येतील-जातील, कालचक्र फिरत राहील…दादांच्या स्मृतींचा सुगंध सदैव दरवळत राहील. महायुतीतील सहकार्य, विकासाची समान दृष्टी आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

About Editor

Check Also

बंधपत्राचे उल्लंघन केले म्हणून कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास आणि आशुतोष रांका यांची तिहार तुरुंगात रवानगी विशेष न्यायदंडाधिकारी महेश कुमार मीना यांचे आदेश

‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना बुधवारी पाच दिवसांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *