‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. नीट पेपरफुटीवरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियावर केलेल्या प्रयत्नांची खिल्ली उडवत अभिजीत दीपके म्हणाले की, मोदींनी देशाच्या सर्वोच्च पदावरून पायउतार होऊन त्याऐवजी ‘इन्फ्लुएन्सर’ बनावे असा खोचक सल्ला दिला.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील आपल्या गावी परतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले की, पंतप्रधान मोदी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून अधिक शोभून दिसतात आणि त्यांनी पायउतार होऊन देश चालवण्याचे काम दुसऱ्या कोणाला तरी करू द्यावे असा खोचक सल्लाही यावेळी दिला.
पंतप्रधानांच्या सोशल मीडियावरील विद्यार्थ्यांना संबोधित करणाऱ्या व्हिडिओंबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारले असता अभिजीत दीपके म्हणाले, मला वाटते की पंतप्रधान मोदींनी आता इन्फ्लुएन्सर बनावे. ते एक इन्फ्लुएन्सर म्हणून चांगले काम करत आहेत. त्यांनी पंतप्रधानपदाची खुर्ची सोडावी जेणेकरून दुसरा नेता ते काम सांभाळू शकेल.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी असाही आरोप केला की, आंदोलन मागे घेतल्यानंतरही विद्यार्थी आंदोलकांचा छळ सुरूच आहे आणि आंदोलनात सहभागी झालेल्यांना लक्ष्य केल्याचा आरोप राज्य सरकारांवर केला.
अभिजीत दीपके म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेतल्यानंतर, विविध राज्यांची सरकारे आंदोलकांचा मागोवा घेऊन त्यांचा छळ करत आहेत. सरकारने विद्यार्थ्यांचा छळ थांबवावा. जर सरकारने असे केले नाही, तर आंदोलक आगामी निवडणुकीत त्यांना धडा शिकवतील, असा इशारा देत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने जनतेचा संताप कमी झालेला नाही. तो सरकारवर होता, भाजपला “तरुणांचा संताप का समजला नाही” असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांना लक्ष्य करणे सुरूच राहिल्यास आंदोलन पुन्हा सुरू होऊ शकते, असा इशारा देत अभिजीत दीपके म्हणाले की, सरकारने आंदोलन संपले म्हणजे चळवळ संपली, अशी चूक करू नये.
अभिजीत दीपके म्हणाले की, हे विद्यार्थी दहशतवादी नाहीत. ते आपल्या देशाचे भविष्य आहेत. जर देशाचे भविष्य अशा प्रकारे धोक्यात आले, जसे धर्मेंद्र प्रधान यांना पायउतार व्हावे लागले… आणि जर सरकारने आमची बाजू घेतली नाही, तर उद्या आम्ही जाऊन सरकार बदलू, गरज पडल्यास पुढचे आंदोलन “अधिक मोठ्या प्रमाणावर” होईल, असा गर्भित इशाराही यावेळी दिला.
अभिजीत दीपके: BJP की तरफ़ से उन्हें पार्टी में शामिल होने का ऑफर धमकियों के साथ मिला,
उनके मुताबिक कहा गया कि BJP जॉइन कर लो तो उनके और उनके परिवार की ज़िंदगी बेहतर हो जाएगी।
इस पर अभिजीत ने कहा, मैं मोदी और अमित शाह के पोते-पोतियों की उम्र का हूँ अगर बच्चों को धमकाना पड़े तो… pic.twitter.com/n4maLp0Acq
— Cockroach Janta Party (@CJP_for_India) July 30, 2026
याशिवाय, दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या सीजेपीच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पेलेट गनचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही सीजेपीच्या संस्थापकांनी केली.
अभिजीत दीपके म्हणाले की, अमित शाह असोत किंवा इतर कोणीही, पेलेट गन चालवण्याचे आदेश देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी केली.
शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपी समर्थकांनी केलेल्या जल्लोषावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना अभिजीत दीपके यांनी स्वयंसेवकांचा बचाव केला आणि सांगितले की, त्यांनी ३६ दिवस कठीण परिस्थितीत आंदोलन केले होते. स्वयंसेवक ३६ दिवस कडक उन्हात आणि पावसात बसले होते. एवढ्या मोठ्या विजयानंतर जल्लोष करण्यात काय गैर आहे? निवडणुका जिंकल्यानंतर भाजप काय करते? भाजपच्या लोकांप्रमाणे स्वयंसेवकांनी रस्ते अडवले नाहीत, असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
माध्यमांशी बोलताना, अभिजीत दीपके यांनी धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर संसदेत त्यांचा सत्कार करण्याच्या भाजपच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा संसदेत सत्कार करताना भाजपला काही लाज वाटली नाही का? असा सवालही यावेळी केला.
प्रश्न पत्रिका फुटीच्या प्रकरणांमधील केंद्र सरकारच्या भूमिकेवरही अभिजीत दीपके यांनी निशाणा साधला आणि म्हटले की, सरकारच्या आश्वासनांची अंमलबजावणी होत नाहीये. तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्न पत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलदगती न्यायालयांचे आश्वासन दिले होते. लोक खूश होते. पण काय झाले? सीबीआयचे वकील हजर न झाल्यामुळे प्रकरणाची पहिलीच सुनावणी पुढे ढकलण्यात आली, असल्याचा आरोपही यावेळी केला.
दरम्यान, अभिजीत दीपके यांनी त्यांना भाजपा पक्षात प्रवेश करावा यासाठी फोनवरून धमक्या येत असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच त्यांच्या कुटुंबियांनाही भाजपामध्ये प्रवेश करण्यावरून धमक्या येत असून भाजपात प्रवेश करण्याची हीच योग्य वेळ असून तेच तुमच्या फायद्याचे राहिल अशी धमकीही देण्यात येत असल्याचे सांगितले.
Marathi e-Batmya