पैलवान दर्पण व सुमितकुमार एशियन चॅम्पियन पै.अमोल बुचडे कुस्ती अकादमीचे जोरदार यश

युनायटेड वर्ल्ड रेसलिंग यांच्या वतीने पटाया थायलंड येथे ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धा सुरू आहे. भारतीय कुस्ती संघ या स्पर्धेत सहभागी झाला आहे. देशाचे प्रतिनिधित्व करत असलेले महाराष्ट्रातील पैलवान सुमितकुमार २० वर्षाखालील ७० किलो फ्रीस्टाईल व दर्पण चौधरी १५ वर्षाखालील ६२ किलो ग्रीकोरोमन वजन गटामध्ये सहभागी होऊन देशासाठी दोन सुवर्णपदके प्राप्त करत देशाच्या सन्मानात भर घातली.

पैलवान सुमितकुमार व दर्पण हे रुस्तम ए हिंद व महाराष्ट्र केसरी पै. अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती अकादमी मारुंजी जिल्हा पुणे येथे ६ वर्षांपासून सराव करत आहेत. पटाया थायलंड येथील सुरू असलेल्या स्पर्धेत सुमितकुमार ७० किलो वजन गटामध्ये व दर्पण ६२ किलो वजन गटात भारतीय कुस्ती संघात निवड होऊन देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सुमितकुमारची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे व दर्पणची दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त पदके जिंकण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत हाय परफॉर्मन्स सेंटर्स सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये सुमितकुमार व दर्पण चौधरी बालेवाडी पुणे येथे प्रशिक्षण शिबिरात दाखल आहेत. या स्पर्धेत सुमितकुमारने प्रथम फेरीत किरगीझस्थान देशाच्या पैलवान विरुद्ध ९-७ अशा गुणफरकाने विजय मिळवला, दुसऱ्या फेरीमध्ये तुर्कस्तान देशाच्या मल्लाविरुद्ध ११-० असा एकतर्फी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम फेरीमध्ये कझाकीस्थान देशाच्या मल्लाविरुद्ध ची कुस्ती चुरशीची व अटीतटीची झाली. यामध्ये १३-७ अशा गुण फरकाने विजय मिळवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. दर्पण चौधरी ने या स्पर्धेत पहिल्या फेरीत थायलंड देशाच्या पैलवान विरुद्ध १०-० गुणांनी एकतर्फी विजय मिळवला, दुसऱ्या फेरीत कझाकिस्तान देशाच्या पैलवान विरुद्ध ६-१ गुणांनी विजय मिळून अंतिम प्रवेश केला अंतिम फेरीमध्ये ताजिकिस्तान देशाच्या पैलवानाला एकतर्फी लढतीमध्ये ५-० पराभूत करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, देशासाठी सुवर्णपदक प्राप्त करून तिरंगा अभिमानाने फडकवला. आशियाई सुवर्णपदक मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी त्यांनी गुरुवर्य पै.अमोल बुचडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वी केली. याबद्दल महाराष्ट्र राज्याच्या कुस्ती क्षेत्रातून पैलवान, वस्ताद, कुस्तीप्रेमी, महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा आयुक्त दीपक सिंगला , मिशन लक्षवेध प्रमुख उप संचालक संजय सबनीस , क्रीडा विकास अधिकारी पै.उत्कर्ष काळे, तसेच अमोल बुचडे कुस्ती अकादमीचे प्रशिक्षक नरेंद्र कुमार, समीर देसाई, विनोद गोरे, कांबळे सर, अनिराज सर, कपिल बुचडे, किसन बुचडे, प्रा महेश घुले, मिलिंद झोडगे, वडील लक्ष्मण भारस्कर व राजू चौधरी, यांनी अभिनंदन केले.

महाराष्ट्र शासनाच्या मिशन लक्षवेध अंतर्गत हाय परफॉर्मन्स सेंटरमुळे राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी उंचावण्यासाठी योग्य व्यासपीठ महाराष्ट्र शासन क्रीडा विभागाने उपलब्ध करून दिले, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील जास्तीत जास्त खेळाडू सर्वोत्तम गुणवत्ता सिद्ध करतील अशी आशा पैलवान अमोल बुचडे यांनी व्यक्त केली.

About Editor

Check Also

राम मंदिर दान चोरी प्रकरणी नवी माहिती बाहेर चोरी प्रकरणाची माहिती आधीच रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला होती

राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणात नवीन तपशील समोर आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *