मंत्री देसाईंचे आदेश, एफएम रेडिओवरील कार्यक्रमात मराठी भाषेचा वापर वाढवा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

आकाशवाणी, दूरदर्शनसह सर्व खासगी रेडिओ वाहिन्यांनी प्राइम टाइममध्ये (महत्वाच्या वेळेत) मराठी भाषेतील कार्यक्रमांना प्राधान्याने स्थान द्यावे, मुंबईतील रेडिओवरील कार्यक्रमात मराठी भाषेचा वापर वाढवावा, अशा सूचना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या. दृक श्राव्य माध्यमातील प्रतिनिधींची बैठक आज मंत्रालयात मंत्री देसाई यांच्या दालनात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह दृकश्राव्य माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यात मराठी भाषेतील कार्यक्रम सुरु राहणे आवश्यक आहे. आकाशवाणीसह विविध खासगी रेडिओ वाहिन्यांवरील मराठी कार्यक्रमांची संख्या कमी झाली आहे. आकाशवाणी व दूरदर्शनवरून अनेक मराठी कार्यक्रम हद्दपार झाले आहेत. या ठिकाणी हिंदी, इंग्रजी कार्यक्रमांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. यापुढे आकाशवाणीने मराठी कार्यक्रमांची संख्या वाढवावी, खासगी रेडिओंनी देखील किमान दोन तास मराठी कार्यक्रम प्रसारित करावेत, असेही त्यांनी सांगितले.
मराठी वाहिन्यांवरून मराठी कार्यक्रम हद्दपार होत असल्याची बाब माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ही निदर्शनास आणून दिली. यावेळी देसाई यांनी संबंधित रेडिओ वाहिन्यांना मराठी भाषेतील कार्यक्रम प्राधान्याने प्रसारित करण्याची सूचना केली. सध्या एफएम वाहिनी, एफ एम गोल्ड वाहिनीवरील मराठी गाण्यांचे कार्यक्रम बंद झाले आहेत. काहींचा वेळ कमी करण्यात आला आहे. दुसरीकडे हिंदी कार्यक्रमांचे दिल्लीवरून प्रसारण होत असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून दिली.
याबाबत सर्व रेडिओ प्रमुख आणि आकाशवाणीच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली जाईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी मनोहर पावनीकर ( आकाशवाणी), कपिलकुमार ढोरे ( दूरदर्शन), शीवल देसाई ( रेडिओ सिटी एफ एम), रिमा अमरापूरकर ( रेडिओ मिर्ची), मयुर शिंगटे ( रेडिओ फिवर), संतोष क्षत्रिय ( एच. टी. मीडीया) आदी उपस्थित होते.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचे नेतृत्व करेल ‘मुंबई टेक विक 2026’ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र एआय क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी अत्यंत सक्षम स्थितीत आहे. मुंबईची आर्थिक ताकद, तंत्रज्ञान कौशल्य, मजबूत स्टार्टअप परिसंस्था …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *