कुचिक प्रकरणातील पिडीतेच्या आरोपांवर चित्रा वाघ म्हणाल्या, जरूर चौकशी करा भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचे आव्हान

बलात्कार पीडितेने आपल्यावर केलेल्या आरोपांची राज्य सरकारने जरूर चौकशी करावी, कोणत्याही चौकशीला आपण तयार आहोत असे आव्हान भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले.
शिवसेना पदाधिकारी रघुनाथ कुचिकप्रकरणातील पीडीतीने आज भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यावरच आरोप करत मला सुसाईड नोट लिहिण्यास चित्रा वाघ यांनीच दबाव आणल्याचा आरोप करत त्यांच्याच सांगण्यावर मी पोलिसांमध्ये तक्रार करण्यास गेल्याचे प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले.
त्याचबरोबर वाघ यांना कोणत्याही स्वरूपाचे मेसेज आपण केलेले नसून त्यांनी खोटे मेसेज वाचून दाखविले असून या प्रकरणात पीडीतेने महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची भेट मागितली आहे. त्यामुळे कुचिक प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यापार्श्वभूमीवर चित्रा वाघ भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितला.
त्यांनी सांगितले की, १६ फेब्रुवारी रोजी सदर तरुणीने मला दूरध्वनी केला. त्यावेळी मी राज्याबाहेर होते. राज्यात परतल्यानंतर २-३ दिवसांनी पुण्यात पीडित तरुणीची माझी भेट झाली. सदर तरुणीने मला तिच्यावर २०१७ पासून झालेल्या अत्याचारांची कथा सांगितली. त्या पीडितेने तिच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात झालेल्या उपचारांबाबतची माहितीही कागदपत्रांसह मला दिली. हे पुरावे पाहून मी त्या तरुणीसाठी लढण्याचे ठरवले. पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह राज्याच्या गृहमंत्र्यांनाही या तरुणीवरील अत्याचारांची माहिती कळवली. ती तरुणी एकटी लढते आहे आपण तिला साथ दिली पाहिजे या भावनेने मी तिच्यासाठी लढण्याचे ठरवले. मुंबईत पत्रकारांपुढे त्या पीडितेला आणून तिची कहाणी ऐकवायला लावली. हे करताना एका महिलेला न्याय देण्याची माझी भूमिका होती. ही माझी चूक असेल तर ती मला कबूल असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर तरुणीने कोणकोणते संदेश मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला पाठवले याची माहितीही वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या म्हणाल्या की, आता पीडितेने कोणत्या हेतूने माझ्यावर आरोप केले आहेत हे मला ठाऊक नाही. ज्यावेळी ही तरुणी न्याय मागत होती त्यावेळी तिच्या मदतीस कोणीही आले नाही. आता तिने माझ्यावर आरोप केल्यानंतर सर्वजण माझ्या विरोधात पीडितेच्या बाजूने बोलत आहेत. या आरोपांबद्दल मी पीडितेला दोष देणार नाही. पीडितेने आरोप केलेल्या शिवसेनेचा नेता रघुनाथ कुचिक याला शिक्षा होण्यासाठी सरकारने पावले टाकावीत एवढीच आपली अपेक्षा आहे. तरुणीच्या आरोपाची राज्य सरकारने हव्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करावी असे आव्हानवजा विनंतीही त्यांनी केली.
या चौकशीतून सत्य बाहेर यावे आणि पीडितेला न्याय मिळावा अशीच आपली भावना असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

 

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित व ३३८ संपर्कात नेपाळमधील महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी विविध शासकीय यंत्रणा कार्यरत

नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या मदतीसाठी विविध पातळीवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *