आखाड्याबरोबरच राजकिय मैदान गाजविणारे सपाचे संस्थापक मुलायम सिंह यांचे निधन वयाच्या ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

इटावा येथे ऐन तारूण्यात कुस्तीचा आखाडा ते समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्यापासून प्रेरणा घेत राजकारणात प्रवेश करत राजकिय मैदान गाजविणारे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं आज सकाळी गुरुग्राममधील रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
मुलायम सिंह यादव यांच्या निधनाची माहिती त्यांचे सुपुत्र तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करत दिली. तसेच मुलायम सिंह यांच्या निधनाचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसच्या नेत्यांसह अनेकांनी त्यांना ट्विटरवरून श्रध्दांजली वाहिली.
मुलायम यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३९ साली उत्तर प्रदेशमधील इटावा येथे झाला. त्यांनी अगदी तरुण वयापासून राजकारणात सक्रीय सहभाग घेतला होता. मुलायम सिंह यादव यांनी तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलं. तसेच १९९६ ते १९९८ दरम्यान ते केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्रीही होते. १९९२ साली मुलायम सिंह यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. ५ डिसेंबर १९८९ रोजी मुलायम यांनी पहिल्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. ते २४ जानेवारी १९९१ पर्यंत या पदावर कार्यकरत होते. नंतर मायावती राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. १९९२ साली समाजवादी पक्षाची स्थापना केल्यानंतर वर्षभरात म्हणजेच ५ डिसेंबर १९९३ रोजी मुलायम सिंह दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.
पुढील ११ वर्षांमध्ये सातत्याने संघर्ष करत त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली. २९ ऑगस्ट २००३ रोजी यांनी तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच म्हणजेच चार वर्ष झाल्यानंतर ११ मे २००७ रोजी पदाचा राजीनामा दिला.
उत्तर प्रदेशच्या राजकारणावर आपली छाप पाडणाऱ्या मुलायम सिंह यादव यांनी केंद्रामध्येही संरक्षण मंत्रीपदासारखी महत्त्वाची भूमिका पार पाडली. एच.डी. देवेगौडा आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना मुलायम सिंह यादव हे संरक्षण मंत्री होते. १ जून १९९६ ते १९ मार्च १९९८ दरम्यान त्यांनी या पदाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर हे पद जॉर्ज फर्नान्डिस यांनी संभाळलं.
देशात आघाड्यांच्या राजकारणामुळे मुलायम सिंग हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील नेता म्हणूनही ओळखले जात होते. उत्तर प्रदेशसह सबंध हिंदी भाषिक पट्यात मुलायम सिंह यांना नेताजी म्हणून ओळखले जात होते. इतकेच काय तर त्यांचे सुपुत्र अखिलेश यादव हे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बोलत असतानाही मुलायम सिंग यांना नेताजी म्हणून संबोधत होते.

 

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपाची मनुवादी काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील भारत वेगळा

देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची. काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *