बदलापूर लैंगिक अत्याचारांचे प्रकरण: मुलाच्या कृत्याची शिक्षा पालकांना का? अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांच्या व्यथेवर उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा

बदलापूर येथील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची शिक्षा मृत आरोपीच्या पालकांना का?, याप्रकऱणात त्यांचा काय दोष?, मृत आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी न्यायालयात मांडलेल्या कैफियतीवर उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करून राज्य सरकारला त्याबाबत विचारणा केली.

मुलाने केलेल्या कृत्याची शिक्षा त्याचे कुटुंबीय का भोगतील ?, त्यांचा यामध्ये दोष काय? असे प्रश्न न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने उपस्थित केले. तसेच शिंदे कुटुंबीयांच्या राहण्याची आणि रोजगाराची व्यवस्था होऊ शकते का?, ते पाहण्याचे आदेश दिले.

पालकांनी मांडली व्यथा

शिंदे कुटुंबीय आपल्या संपर्कात नसल्याचा दावा मागील सुनावणीवेळी त्यांच्या वकीलांकडून करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन शिंदे कुटुंबीयांना न्यायालयात प्रत्यक्ष अथवा व्हिसीमार्फत हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुरुवारी अक्षय शिंदेचे आई-वडील दोघेही न्यायालयात हजर होते. लैंगिक अत्याचाराप्रकरणी मुलाच्या अटकेपासून आपण कुठेही गेले तरी आपल्याला लक्ष्य केले जाते. आम्हाला बदलापूर येथील राहत्या घरातही राहून दिले नाही. आम्हाला आमच्या घरातून हाकलून देण्यात आले. आम्ही कल्याण रेल्वे स्थानकावर राहतो. आमच्याकडे नोकरी ही नाही, कोणी नोकरी देतही नाही. त्यामुळे आमच्याकडे पैसे नाहीत, अशी व्यथा मृत आऱोपी अक्षय शिंदेच्या पालकांनी न्यायालयात मांडली.

त्यांचे पुनर्वसन करा

याचिकाकर्ते हे पालक आहेत. ते आरोपी नाहीत. मुलाने केलेल्या कृत्याची शिक्षा, त्रास त्यांनी का भोगावा, त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या रोषाला का सामोरे जावे, अशी विचारणा न्यायालयाने सराकरी वकिलांना केली. काय केले जाऊ शकते? त्यांचे सरकारच्या मदतीने कुठेतरी पुनर्वसन करता येऊ शकते का? काही स्वयंसेवी संस्था त्यांना नोकरी किंवा निवारा शोधण्यात मदत करू शकतात. त्यांनी जगण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी सक्षम असणे आवश्यक आहे, असेही खंडपीठाने नमूद केले. तसेच राज्य सरकार किंवा कोणत्याही स्वयंसेवी संस्थेमार्फत पालकांना काही मदत करता येते का ते पाहण्याचे आदेश सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांना देऊन सुनावणी १३ जानेवारीपर्यंत तहकूब केली.

काय प्रकरण

बदलापूर येथील शाळेत १ ऑगस्टपासून कंत्राटी तत्त्वावर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या अक्षय शिंदे या २३ वर्षीय तरूणाने शाळेतील तीन आणि चार वर्षांच्या दोन बालवाडी विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पोलिस तपासातील गंभीर त्रुटींबद्दल जनक्षोभ उसळल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापना केली. अटकेनंतर काही दिवसांनी आरोपी शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या प्रकरणाची उच्च न्यायालयाने स्वतःहून याचिका दाखल केली असून न्यायालय तपासावर देखरेख करीत आहे.

About Editor

Check Also

अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांच्या शिक्षेला स्थगिती १८ मार्चपर्यंत राजपाल यादव यांच्या शिक्षेला स्थगिती

दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी राजपाल यादव यांची चेक बाउन्स प्रकरणात शिक्षा स्थगित केली, ज्यामुळे त्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *