सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला, संसद चालवायची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची संसदेचं कामकाज सुरळीत चालू ठेवण्यात सरकार अपयशी ठरल

संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. त्यांनी पुढाकार घेऊन चर्चा केली पाहिजे, पण दुर्दैवाने देशातील मायबाप जनतेला मला हे सांगावं लागेल की, यावेळी संसदेचं कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी पार पाडण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लगावला.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस पण भाजपाच्या भूमिकेमुळे संसदेचे कामकाज झाले नसल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, अधिवेशनात राज्य, देश आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्याशी संबंधित विषयांवर चर्चा करावी यासाठी आम्ही संसदेत जातो. पण जेव्हा गदारोळ होतो आणि चर्चाच होत नाही, त्यावेळी खूप अस्वस्थ वाटतं. एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक आंदोलन करत असतात, जो त्यांचा अधिकारही आहे. पण यंदाच्या अधिवेशनात सत्ताधारीही आंदोलन करताना दिसले. मतं वेगळी असू शकतात, त्यात काही गैर नाही पण एका सशक्त लोकशाहीत संसदेमध्ये चर्चा व्हायलाच हवी अशी भूमिका स्पष्ट केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्याची दृश्य अतिशय अस्वस्थ करणारी होती. महाराष्ट्रात अशी गुंडागर्दी आम्ही कधीही पाहिली नाही. आम्ही अशी गुंडागर्दी खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की नाही, असा संशय व्यक्त केला.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटनांमुळे राज्यात सध्या अस्थितरता दिसते. रोज कुठेना कुठेतरी मारामाऱ्या, खून, दहशत माजवणे, असे प्रकार होत आहेत. मुंबईच्या कल्याणमधील घटनेने पुन्हा एकदा मराठी-परप्रांतीय वाद उफळला आहे. राज्यात महायुतीला जनतेने मोठा बहुमत दिले आहे, मात्र तरी देखील अद्यापही राज्याला गृहमंत्री नाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तातडीने ॲक्शन घेऊन हे थांबवला पाहिजेत अशी मागणीही यावेळी केली.

बीडमधील खुनप्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात सध्या बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्येचे प्रकरण गाजत आहे. पोलीस अधिकाऱ्यांची बदली करून काही होणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तसेच पोलीस अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव होता का? हे तपासून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत दरवेळी वर्दी घालणाऱ्यांवर कारवाई करायची आणि षडयंत्र रचणारा घटनेमागील खरा सूत्रधार मात्र मोकळा, असं नाही चालणार असा खोचक सल्लाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

शेवटी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात खून, मारामारी, दहशत माजविण्याचे प्रकार ही नित्याचीच बाब झाली आहे. बारामतीत खून झाल्याची घटना घडली. ही गेल्या काही दिवसांतील तिसरी घटना आहे. तर तिकडे कल्याणमध्ये तुम्ही मराठी माणसं घाण आहात असा आरडाओरडा करीत एका मराठी माणसाला त्याच्या राहत्या सोसायटीत गुंडांकरवी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही अतिशय गंभीर परिस्थिती असून सर्वसामान्य माणूस भीतीच्या छायेखाली वावरत आहे. राज्य सरकारने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन राज्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *