मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबर मध्ये पहिल्या विमानाचे “टेक ऑफ” जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली होणार कार्यान्वित

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद “बॅग क्लेम सिस्टीम” विकसित करण्यात यावी, हे या विमानतळावरील प्रमुख वैशिष्ट्य असावे, अशी सूचना आज मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना येथे दिली. सद्य:स्थितीत या विमानतळाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करून सप्टेंबरमध्येच पहिले प्रवासी विमान उडणार, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रगतीपथावरील कामाची पाहणी करतांना ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, मंदा म्हात्रे, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी किसन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, राजा दयानिधी, गणेश देशमुख, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, गीता पिलाई , नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय सिंह येनपुरे, उपायुक्त रश्मी नांदेडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर सर्व मान्यवरांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रगतीपथावर असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. ही पाहणी करताना त्यांनी विशेषतः विमान प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या १ आणि २ टप्प्यामध्ये २० दशलक्ष प्रवासी आणि ०.८ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची क्षमता आहे, हे विमानतळ सप्टेंबर २०२५ मध्ये कार्यान्वित होण्यासाठी सज्ज होत आहे. या विमानतळाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते आणि त्याचे उद्घाटनही आता त्यांच्याच हस्ते होणार आहे, याचा विशेष आनंद असल्याचेही सांगितले.

कामांची पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रकल्पाच्या सद्य:स्थितीविषयी माहिती दिली की, १० जून २०२२ रोजी सिडकोतर्फे १ हजार १६० हेक्टरच्या संपूर्ण जागेवर १००% प्रवेश आणि मार्गाधिकारासाठी अनुज्ञप्ती एनएमआयएएलला प्रदान करण्यात आली आहे. सर्व पुनर्वसन पूर्ण झाले आहेत आणि सिडकोने भूसंपादन आणि पुनर्वसन यासाठी अंदाजे २००० कोटी खर्च केले आहेत.
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (NMIAL) या कंपनीने २९ मार्च २०२२ रोजी प्रकल्पासाठी वित्तीय ताळेबंदी (Financial Closure) साध्य केली, ज्यामध्ये एसबीआय SBI ने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टप्पा-1 आणि टप्पा २ साठी १९ हजार ६४७ कोटी रु. एकूण प्रकल्प खर्चापैकी १२ हजार ७७० कोटी रु. मंजूर केले आहेत (NMIAL द्वारे रु. १५ हजार ९८१ कोटी आणि सिडकोद्वारे रु. ३ हजार ६६५ कोटी)

सिडकोतर्फे १ हजार १६० हेक्टर क्षेत्रामध्ये ५.५ मीटरपर्यंत भूविकास, उलवे नदीचा प्रवाह वळविणे आणि उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे स्थानांतरण, ही विकासपूर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

११ ऑक्टोबर २०२४ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमान C-295 द्वारे उद्घाटन लँडिंग करण्यात आले आणि त्यानंतर SU 30 ने दोन लो पास केलेत. तसेच इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस A320 ने २९ डिसेंबर २०२४ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले व्यावसायिक लँडिंग यशस्वीरित्या पूर्ण केले.

३० जून २०२५ पर्यंत या प्रकल्पाने एकूण ९६.५% भौतिक प्रगती साधलेली आहे. सध्या जवळपास १३ हजार कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत तर उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. आणि कोणत्याही परिस्थितीत सप्टेंबर पूर्वी हे काम पूर्ण करावे, अशा सूचना सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

About Editor

Check Also

भारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र शाखेतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न शासकीय खरेदी प्रक्रिया आणि गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस चे महत्व याविषयी मार्गदर्शन

भारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने विविध विषयांवर  एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *