राज्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने विविध कठोर उपाययोजना हाती घेतल्या असून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील लक्षवेधी सूचनेवर दिली.
राज्यातील महामार्गावर चालविण्यात येत असलेल्या खासगी स्लिपर कोच बसेसच्या अपघातासंदर्भात सदस्य धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. यावेळी सदस्य जयंत पाटील, भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, देवयानी फरांदे आदींनी या चर्चेत सहभाग घेतला.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, गेल्या वर्षी झालेल्या भीषण बस अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. संबंधित बस पुणे नोंदणी क्रमांकाची होती आणि प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले. तसेच ऑक्टोबर २०२३ मध्ये समृद्धी महामार्गावरील वैजापूर येथे झालेल्या अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. अशा घटना गंभीर आहेत. २५ जणांचा मृत्यू झालेल्या अपघातातील चालक दारूच्या नशेत असल्याचे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले. बस पलटी झाल्याने प्रवाशांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. काही खासगी बस चालक स्लीपर कोचच्या नावाखाली बसमध्ये अनधिकृत बदल करतात. पूर्वी एकच स्लीपर कोच असायचा; आता दोन स्तरांवर स्लीपर कोच बसवले जातात. परदेशात स्लीपर कोचला बंदी आहे; मात्र आपल्या देशात केंद्र सरकारच्या नियमानुसार सेवा सुरू असल्याने बंदी नाही. महाराष्ट्राने बंदी घातली तरी इतर राज्यांत नोंदणीकृत बस येथे येऊ शकतात, असेही स्पष्ट केले.
पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, अपघात रोखण्यासाठी राज्यभर चेकपोस्ट उभारण्यात आले असून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले असून गेल्या वर्षभरात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण एक टक्क्याने घटले आहे. मात्र हे समाधानकारक नसून अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की, वेग नियंत्रणासाठी बसमध्ये ८० किमी प्रतितास मर्यादेचा स्पीडोमीटर बसवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. काही बस १२० ते १४० किमी वेगाने धावत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच ब्रेक अॅनालायझर यंत्रणा बसवण्याचा विचार सुरू आहे. चालकाने दारू प्यायल्यास ही यंत्रणा बस सुरू होऊ देत नाही. या यंत्रणेची किंमत दीड लाख रुपये आहे. एसटी महामंडळाच्या नव्या बसमध्ये तसेच टाटा आणि अशोक लेलँड कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या बसमध्ये ही यंत्रणा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी बस चालकांनीही ही यंत्रणा बसवावी, असे निर्देश देण्यात आले असल्याचे यावेळी सांगितले.
तसेच पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, रस्ते सुरक्षेसाठी आराखडा तयार केला जात आहे. रिफ्लेक्टर, अॅरो मार्किंग, यु-टर्न आणि स्ट्रेट लेनसाठी दिशादर्शक फलक, १००, २००, ३००, ५०० मीटर अंतर दर्शवणारे बोर्ड लावण्याची योजना आहे. हा आराखडा राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, एसटी महामंडळाचे मार्ग तसेच महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरही लागू केला जाणार आहे. अंतिम टप्प्यातील या आराखड्याला लवकरच मान्यता मिळेल, असे सांगितले.
शेवटी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, सांगली येथे एका बसचे चेसी नंबर वेगवेगळ्या प्रकारे वापरल्याची बाब निदर्शनास आली असून त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे, नियमांचे उल्लंघन करणे किंवा फसवणूक आढळल्यास संबंधितांवर कारवाई करून आवश्यक असल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सभागृहात उपस्थित सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची चौकशी करून तातडीने कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली.
Marathi e-Batmya