हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीस भाजपाचे मोदी- फडणवीस सरकारच जबाबदार कांद्याच्या हमीभावासाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये मविआचा शेतकरी क्रांती महामोर्चा, प्रति क्विंटल ३ हजार रुपये हमीभाव द्या

कांद्याला सध्या प्रति क्विंटल २००-३०० रुपये एवढा कमी भाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आजच्या विदारक परिस्थितीस भाजपाचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल करत शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमीभाव मिळाल्याशिवाय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही, सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. यावेळी रास्ता रोकोही करण्यात आला. या शेतकरी महामोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना (उबाठा) आमदार अंबादास दानवे, आमदार रोहित पवार, खा. शोभाताई बच्छाव, खा. भगरे गुरुजी, नाशिक ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष भारत टाकेकर, रमेश कहांडोळे, नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू खैरे तसेच महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनादरम्यान पोलिसी बळाचा वापर करून नेत्यांना ताब्यात घेतले, मात्र शेतकऱ्यांचा संघर्ष दडपून टाकता येणार नाही. “सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, महागाईने शेतकऱ्यांना जगणे, शेती करणे कठीण झाले आहे, शेतमालाला हमीभाव मिळत नाही. कांद्याचे भाव पडलेले आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे पण सरकार मात्र झोपेतून जागे होत नाही. कांद्याची शासकीय खरेदी करण्याची घोषणा केली पण अद्याप कांदा खरेदी सुरु झालेली नाही. कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातूनच झाली पाहिजे. कांदा खरेदीत व्यापाऱ्यांचे भले करु नका, शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा खोटारडा माणूस आहे, त्यांनी आजपर्यंत केलेल्या घोषणा कधीच पूर्ण केलेल्या नाहीत. शेतकरी अडचणीत असताना भाजपा सरकार मदत करत नाही. बळीराजाला छळणाऱ्या भाजपा सरकारला खाली खेचल्याशिवाय आता गत्यंतर नाही. काँग्रेस पक्ष व संपूर्ण महाविकास आघाडी शेतकऱ्यांबरोबर असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही यावेळी दिला.

यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिदे, आ. रोहित पवार यांनीही शेतक-यांना मार्गदर्शन करताना भाजपा सरकारवर सडकून टीका केली.

About Editor

Check Also

नरहरी झिरवाळ यांचे आश्वासन, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अतिरिक्त निधीसाठी पाठपुरावा सुरू वाढत्या महागाईचा विचार करून शिष्यवृत्ती वाढविण्याचा विचार

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी आवश्यक अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न असून, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *