मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत आज विरोधकांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीने निवडणूक आयोग कार्यालयावर (निर्वाचन सदन) धडक मोर्चा काढला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सर्व अडथळे पार करत आंदोलकांसह निवडणूक आयोग कार्यालयाच्या दिशेने कूच केले. या वेळी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
संसदेच्या आवारातून सुरू झालेला हा मोर्चा ‘निर्वाचन सदन’कडे जात असताना पोलिसांनी अनेक स्तरांवर बॅरिकेड्स लावून खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुल गांधी यांनी अचानक एका बॅरिकेडवर चढून हातात राष्ट्रध्वज उंचावला. त्यांच्या या कृतीमुळे आंदोलकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
पोलीस बसमधून मारली उडी
आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना ताब्यात घेऊन पोलीस बसमध्ये बसवले. मात्र, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पोलीस बसमधून थेट बाहेर उडी मारली आणि पुन्हा निवडणूक आयोग कार्यालयाच्या दिशेने पायी जाण्यास सुरुवात केली.
“३०० खासदार भेटू इच्छितात, पण आयुक्त घाबरलेत”: राहुल गांधी
पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “निवडणूक आयोगाचे कार्यालय येथून अवघ्या ५० मीटर अंतरावर आहे, तरीही आम्हाला तेथे जाऊ दिले जात नाही. मला समजत नाहीये नक्की अडचण काय आहे. निवडणूक आयोगाचे काम निष्पक्षपणे निवडणुका घेणे हे आहे. सुमारे ३०० खासदार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना भेटू इच्छितात, परंतु ते घाबरले आहेत. देशात नक्की काय चालले आहे, हेच कळत नाही.”
ते पुढे म्हणाले, “जर जनतेच्या प्रतिनिधींनाच निवडणूक आयोगाला भेटू दिले जात नसेल, तर या लोकशाहीला काय अर्थ उरतो?”
‘लोकशाही वाचवा’ (Save Democracy) असे फलक हातात घेऊन विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद भवनापासून निर्वाचन सदनापर्यंत मोर्चा काढला. या संपूर्ण आंदोलनामुळे दिल्लीत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे खासदार कमालीचे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवल्यानंतर त्यांनी जवळच्या आकाशवाणी भवनमध्ये ठिय्या मांडला. या आकाशवाणी भवन आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये केवळ ३०० मीटरचे अंतर आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांनी या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केल्याचं चित्र आहे.
इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे कूच केल्यानंतर त्यांना दिल्ली पोलिसांनी अडवलं. त्यानंतर आक्रमक झालेल्या राहुल गांधी यांनी बॅरिकेड्सवर चढून तिरंगा फडकावला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांना ताब्यात घेतलं आणि बसमध्ये बसवलं. मात्र या बसला काँग्रेसच्या खासदारांनी चारही बाजूने घेरल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी बाहेर येऊन गनिमी काव्याने जवळच्या आकाशवाणी भवनमध्ये गेले आणि त्या ठिकाणी दोन तासांपेक्षा जास्त काळ ठिय्या मांडला.
Marathi e-Batmya