महिला शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतील योगदानाची अधिकृत ओळख मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीसाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज ७ ऑक्टोबर पर्यंत राज्यभरातून तब्बल ३७ लाख ९३ हजार ०५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातील प्रत्येक पात्र महिला शेतकरी या उपक्रमाशी जोडली जावी, यासाठी कृषी विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत, असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाने नुकतेच ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा, २०२६’ विधेयक पारित केले आहे. त्यानुसार महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख, समान अधिकार आणि शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शेतकरी महिला प्रमाणपत्र देण्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे.
आज ७ ऑक्टोबर पर्यंत राज्यभरातून तब्बल ३७ लाख ९३ हजार ०५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी राज्यातील ८९५ ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन ६८ हजार ४३६ महिलांना शेतकरी महिला प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे. ग्रामसभा झाल्यानंतर पुढील १५ दिवसांमध्ये शेतकरी महिलांना प्रमाणपत्र वितरित केले जाते. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात नोंदणी होत आहे.
अर्जसंख्येत यवतमाळ जिल्हा आघाडीवर असून, तेथून २ लाख ५३ हजार ४३९ अर्ज प्राप्त झाले आहेत. सातारा २ लाख १४ हजार ७८७, नाशिक २ लाख १० हजार ३२७, अमरावती २ लाख ०५ हजार ०७४, पुणे १ लाख ७३ हजार ०४९ एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. याशिवाय बुलढाणा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नंदुरबार, जळगाव, नांदेड, धाराशिव, धुळे, बीड आणि जालना जिल्ह्यांतून एक लाखांहून अधिक महिला शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तालुकानिहाय नोंदणीत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात सर्वाधिक ३५ हजार ४२२ नोंदणी झाली आहे.
कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हा व तालुकानिहाय नोंदणीचे सातत्याने संनियंत्रण केले जात असून, कमी नोंदणी असलेल्या भागांत जनजागृती करून नोंदणीला गती देण्यात येत आहे. अशी माहिती कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ हा कालावधी ‘सेवा संकल्प अभियान’ म्हणून साजरा होत असून, १७ सप्टेंबर रोजी महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या ऑनलाइन पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. या सेवा संकल्प अभियानात आतापर्यंत राज्यातील विविध विभागांच्या तुलनेत कृषी विभागात सर्वाधिक नोंदणी झाली असून, महिला शेतकऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्वाधिक सहभाग नोंदविला आहे. हा सहभाग महिला शेतकऱ्यांचा शासनाच्या योजनांबाबत वाढता विश्वास आणि सक्रिय सहभाग दर्शविणारा आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. तसेच राहिलेल्या महिलांनी लवकरात लवकर ऑनलाइन नाव नोंदणी करुन घ्यावी असेही त्यांनी आवाहन केले आहे.
Marathi e-Batmya