हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजाच्या वेदना व दुःख भाजपा महायुतीला कळलेच नाही, ५ हजारात दिवाळी कशी होणार ? शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता येत नसतील तर निदान त्यांच्या दुःखाची थट्टा तरी करू नका

राज्यातील शेतकरी अस्मानी संकटाने पुरता हवालदिल झाला आहे. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम हातातून गेला आहे, दसरा दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. दिवाळीचा सण कसा करायचा हा यक्षप्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे, मायबाप सरकार मदतीला धावून येईल अशी अपेक्षा असताना सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. प्रचंड महागाई असताना ५ हजार रुपयात दिवाळी कशी करणार?, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वाशिम जिल्ह्यातील किनवड, मालेगाव, पांडव उमरा, तांदळी, कामठवाडा येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अमित झनक, वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल चौधरी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस दिलीप सरनाईक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवादही साधला.

प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गेल्या ७५ दिवसांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे खरीप हंगाम पूर्णपणे कोलमडला आहे. पिकं करपली, सोयाबीनच्या शेंगांत दाणे नाहीत, उत्पादनाची आशा मावळली; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. अस्मानी संकटाने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना महायुती सरकारच्या असंवेदनशीलतेने त्याच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. दिवाळी गोड करण्याच्या वल्गना करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने अवघ्या ५ हजार रुपयांची अग्रीम मदत जाहीर करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. शेतकऱ्यांच्या दुःखाचा अपमान करणाऱ्या आणि आपली जबाबदारी झटकणाऱ्या सरकारचा त्यांनी निषेध केला.

शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शेतकऱ्यांना तुटपुंज्या मदतीची खैरात नको, हेक्टरी १ लाख रुपये सरसकट मदत आणि संपूर्ण कर्जमाफी हवी, जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या, शेतमजुरांना सानुग्रह अनुदान, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन झाले पाहिजे. सर्वेक्षण, बैठका आणि घोषणांचे फार्स बंद करा आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा करा. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष थांबणार नाही असेही सपकाळ म्हणाले…

About Editor

Check Also

राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ चे पुरस्कार वितरण • सांगलीच्या मोरया गणेश मंडळाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक• हाँगकाँगच्या महाराष्ट्र मंडळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *