बाहुबलीची सिक्रेट क्रश कोण?

मुंबई: प्रतिनिधी

तरुण असो वा तरुणी प्रत्येकाच्या मनात कोणी ना कोणी दडलेलं असतं. मग तो सर्वसामान्य असो, वा एखादा स्टार. मनाच्या एका कोनाड्यात प्रत्येकाचा क्रश दडलेला असतो. रुपेरी पडद्यावर चमचमणाऱ्या ताऱ्यांच्या मनातील क्रश जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. ‘बाहुबली’सारख्या विक्रमी चित्रपटामध्ये शीर्षक भूमिका साकारणाऱ्या प्रभासचं नाव आजवर बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. ‘बाहुबली’ प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटात देवसेनेची भूमिका साकारणाऱ्या अनुष्का शेट्टीशीच प्रभासची जोडी जमवून बरेच जण मोकळे झाले आहेत. या सर्वांमध्ये प्रभासची क्रश जाणून घेण्याचा प्रयत्न बऱ्याचदा करण्यात आला, पण त्याने मौन बाळगणंच पसंत केलं.

आता मात्र प्रभासने आपली सीक्रेट क्रश जगजाहिर केली आहे. ९०च्या दशकात आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करत ‘मस्त मस्त गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रवीना टंडन आपली सिक्रेट क्रश असल्याचं प्रभासने सांगितलं आहे. आज तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या प्रभाससारख्या सुपरस्टारलाही रवीना आवडते हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. प्रभासला जेव्हा याबाबत विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की, मी रवीनाचा खूप मोठा चाहता आहे. जेव्हा मी ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटामधील ‘एलो जी सनम हम आ गए…’ हे गीत पाहतो, तेव्हा ‘क्या बात है’ हे शब्द नेहमीच अनाहुतपणे माझ्या मुखातून बाहेर पडतात आणि रवीनाच्या अदाकारीला मनोमन सलाम करतो.

योगायोग म्हणजे प्रभासची शीर्षक भूमिका असलेला ‘बाहुबली’ हा चित्रपट रवीनाचे पती अनिल थाडानी यांनीच वितरीत केला होता. या दरम्यान प्रभास आणि रवीना यांच्यात मैत्री झाली. आता जेव्हा कधी प्रभासचा मुंबई दौरा होतो, तेव्हा तो अनिल आणि रवीना यांना भेटतोच. खरं तर ‘बाहुबली’मध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या राणा दग्गुबतीने अनिल यांना प्रभास हा रवीनाचा फार मोठा चाहता असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर जेव्हा प्रभास आणि रवीना यांची पहिली भेट झाली, तेव्हा एखाद्या सर्वसामान्य चाहत्याप्रमाणे प्रभासने रवीनासोबत एक सेल्फीही काढला होता.

About Editor

Check Also

ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध मान्यवर आणि चाहत्यांनी घेतले अखेरचे दर्शन

ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *