वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ‘भारत टेक्स’मधील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन उद्योगस्नेही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन

नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपममध्ये आयोजित करण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग प्रदर्शन ‘भारत टेक्स २०२६’ मध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यंदा महाराष्ट्राचा भागीदार राज्य (पार्टनर स्टेट) म्हणून या प्रतिष्ठित प्रदर्शनात सहभाग असून, राज्याच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील क्षमता, परंपरा आणि आधुनिकतेचा संगमाचे दर्शन या दालनातून होत आहे.

वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव अंशू सिन्हा, महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त श्वेता सिंघल, वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने, उपसचिव श्रीकृष्ण पवार, रेशीम विभागाचे उपसचिव तुषार पवार यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे दालन राज्याच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे

उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे दालन हे राज्याच्या समृद्ध वस्त्रोद्योग परंपरेसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे आहे. पारंपरिक तंतूपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा संपूर्ण प्रवास या दालनातून प्रभावीपणे साकारण्यात आला असून, महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग धोरण हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही धोरणांपैकी एक असल्याचे नमूद केले.

मंत्री संजय सावकारे म्हणाले की, २०१७ ते २०२३ या वस्त्रोद्योग धोरणाला उद्योजकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्य सरकारने २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी अधिक व्यापक आणि आकर्षक धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत विविध झोननुसार भांडवली अनुदान, वीज दरावरील सवलती, यंत्रसामग्री खरेदीसाठी आर्थिक सहाय्य, कर सवलती आणि इतर अनेक प्रोत्साहनपर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचा वेग वाढला असून नवीन उद्योग उभारण्यासाठी राज्य सर्वार्थाने अनुकूल ठरत आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात प्रगती करू इच्छिणाऱ्या उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहनही केले.

‘टेक्सटाइल डॅडी’ संकेतस्थळाचे उद्घाटन

याच कार्यक्रमात वस्त्रोद्योग क्षेत्राला आधुनिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘टेक्सटाइल डॅडी’ या संकेतस्थळाचेही उद्घाटन करण्यात आले. उत्पादक, पुरवठादार, खरेदीदार आणि उद्योगाशी संबंधित विविध घटकांना एकाच डिजिटल मंचावर जोडून व्यवसाय सुलभ करणे, बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि उद्योगांना नवीन संधी निर्माण करून देणे हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे. राज्याच्या वस्त्रोद्योग क्षेत्राच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी महाराष्ट्र दालनातील विविध स्टॉल्सची पाहणी केली. या दालनात महाराष्ट्र हँडलूम कॉर्पोरेशन लिमिटेड, महाराष्ट्र पॉवरलूम कॉर्पोरेशन लिमिटेड, रेशीम संचालनालय, उद्योग विभाग आणि अमरावती येथील पीएम मित्र  पार्क या पाच प्रमुख किऑस्कच्या माध्यमातून राज्याच्या वस्त्रोद्योग क्षेत्राची विविधांगी ताकद सादर करण्यात आली आहे.

या दालनात पारंपरिक पैठणी, करवत काठी, हिमरू, खण साड्या, सोलापूरच्या जगप्रसिद्ध चादरी, बांबू टॉवेल्स, टेरी टॉवेल्स तसेच भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) प्राप्त कोल्हापुरी चपला यांसारख्या महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात आले असून, देश-विदेशातील खरेदीदार, निर्यातदार आणि उद्योग प्रतिनिधींकडून या उत्पादनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

१४ जुलै रोजी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह आणि केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांच्या उपस्थितीत ‘भारत टेक्स २०२६’चे उद्घाटन झाले. १३० हून अधिक देशांतील सुमारे ६,००० आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि १.३ लाखांपेक्षा अधिक व्यावसायिक प्रतिनिधी या जागतिक प्रदर्शनात सहभागी झाले आहेत.

About Editor

Check Also

Essar Group will set up the largest steel project in US history.

Essar Group अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प उभारणार ट्रम्प यांची मोठी घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील एस्सार ग्रुपच्या (Essar Group) एका मोठ्या प्रकल्पाची घोषणा केली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *