‘एमएसएमई’ची हेल्पलाईन सुरू; उद्योजकांना तज्ज्ञ मार्गदर्शन मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर (MCCIA) यांच्या माध्यमातून ही हेल्पलाईन सेवा

राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन, माहिती आणि तज्ज्ञ सल्ला सहज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र आरएएमपी RAMP (Raising and Accelerating MSME Performance) कार्यक्रमांतर्गत एमएसएमई MSME हेल्पलाईनची सुरूवात करण्यात आली आहे. या हेल्पलाईनद्वारे राज्यभरातील उद्योजकांना पूर्णतः मोफत मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MoMSME), भारत सरकार आणि जागतिक बँक यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या RAMP कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम महाराष्ट्रात महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) मार्फत कार्यान्वित करण्यात आला आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर (MCCIA) यांच्या माध्यमातून ही हेल्पलाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

राज्यातील कोणत्याही भागातील उद्योजक +918308809334 या क्रमांकावर कॉल किंवा WhatsApp करून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. उद्योग क्षेत्रातील विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती, वित्तीय सल्ला, बाजारपेठ उपलब्धता तसेच व्यवसाय विकासासाठी आवश्यक सहाय्य या माध्यमातून मिळणार आहे.

या हेल्पलाईनद्वारे नवीन उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, उद्यम नोंदणी (Udyam Registration), GST नोंदणी व करसंबंधित सल्ला, वित्तीय नियोजन, कर्ज व पतपुरवठा, विविध अनुदान योजनांची माहिती, GeM पोर्टलवरील नोंदणी, मार्केटिंग व ब्रँडिंग, आयात-निर्यात व्यवसाय, प्रकल्प अहवाल तयार करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.

शासनाच्या अनेक योजना आणि सुविधा उपलब्ध असूनही अनेक उद्योजकांना वेळेवर योग्य माहिती व तज्ज्ञ सल्ला मिळत नसल्याची बाब लक्षात घेऊन ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून उद्योजकांच्या अडचणी दूर करून त्यांच्या व्यवसायवृद्धीस चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

विशेषतः नवउद्योजक, महिला उद्योजिका, स्टार्टअप्स, ग्रामीण भागातील उद्योग, कारागीर, स्वयंरोजगार गट तसेच विद्यमान उद्योगांच्या विस्ताराची योजना आखणाऱ्या उद्योजकांना या उपक्रमाचा मोठा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात एमएसएमई MSME क्षेत्राचा महत्त्वपूर्ण वाटा असून रोजगारनिर्मिती, उत्पादनवाढ, निर्यात वाढ आणि स्थानिक अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणामध्ये या क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्र आरएएमपी RAMP कार्यक्रमाच्या माध्यमातून एमएसएमई MSME क्षेत्राची स्पर्धात्मकता वाढविणे, बाजारपेठ उपलब्ध करून देणे, संस्थात्मक क्षमता मजबूत करणे आणि उद्योगांच्या शाश्वत विकासाला चालना देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी राज्यातील सर्व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्टअप्स, महिला उद्योजिका, कारागीर, स्वयंरोजगार गट आणि नवउद्योजकांना या हेल्पलाईनचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

नवीन उद्योग सुरू करणे, व्यवसाय विस्तार, वित्तीय सहाय्य, सरकारी खरेदी प्रक्रियेत सहभाग, निर्यात व्यवसाय सुरू करणे किंवा शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी उद्योजकांनी या मोफत सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ यांनी केले आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे वाहतूक व मालवाहतुक होणार वेगवान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग प्रकल्पाची पाहणी

भारत सरकार मार्फत सुमारे १ लाख कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा सुमारे १,४०० किलोमीटर लांबीचा, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *