नागरिकांनी कर्करोग तपासणीसाठी पुढे यावे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन कर्करोगाबाबत जागृती, तपासणी आणि उपचार अशा तीन स्तरावर मोहीम

राज्यात सर्व प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाच्या तातडीने निदानासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. तपासणीसाठी नागरिकांमध्ये जागृती वाढविण्यात येत असून नागरिकांनी या तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

पुढे बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, कर्करोग तपासणीसाठी राज्यात सध्या आठ वाहने असून यांची संख्या वाढवून सर्व जिल्ह्यांमध्ये वाहने उपलब्ध करुन दिली जातील,  महिलांमधील स्तनाच्या कर्करोगासंदर्भातील तपासणीवर भर देण्यात येत असून याअंतर्गत ३ कोटी २० लाख महिलांची तपासणी करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली.

कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात सदस्य सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य सर्वश्री अमीन पटेल, रईस शेख, बाबासाहेब देशमुख, भास्कर जाधव, राजकुमार बडोले, शेखर निकम, दिलीप लांडे, तमिल सेल्वन, समीर कुणावार, किशोर पाटील, सुलभा खोडके, देवयानी फरांदे आदींनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला. या लक्षवेधीला उत्तर देताना आरोग्यमंत्री आबिटकर बोलत होते.

याबाबत अधिक माहिती देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, १६ ऑक्टो २५ च्या शासनाच्या धोरणाप्रमाणे तालुका, जिल्हा आणि राज्यस्तर अशा तीन स्तरावर उपचार पद्धती राबवून जागृती, तपासणी आणि उपचार यावर भर दिला जात आहे. २६  ठिकाणी पीपीपी तत्वावर रेडिओथेरपीचे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या वतीने ९  ते १३ वर्ष वयोगटातील मुलींच्या तपासणीची मोहीम देशभरात सुरू होणार असून त्यांचे लसीकरण देखील करण्यात येईल. मुंबईत कर्करोगाच्या तपासणी आणि उपचाराबाबत महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येईल. कोकणामध्ये कर्करोगाच्या तपासणीसाठी केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच कर्करोगाच्या औषधांच्या किंमतीसंदर्भात कंपन्यांसोबत चर्चा करण्यात येईल, असेही सांगितले.

शेवटी बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचाराची तरतूद करण्यात आली आहे. किमो थेरपी आणि रेडिएशनसाठी उपचारांच्या खर्चाचा या योजनेत समावेश असून पेट स्कॅनची सुविधा महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे यासंदर्भातील चर्चेच्या उत्तरात सांगितले.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांचे आदेश, सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करा आरोग्य योजनांच्या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांचे सक्षमीकरण व्हावे

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेले उपचार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *