राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ‘१०० सर्वाधिक प्रभावशाली महिलांचा सन्मान’ महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती

महिला स्वयंसहायता गटांमुळे देशातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सक्षमीकरणाला गती लाभली असून ग्रामीण – आदिवासी महिलांच्या जीवनात क्रांतिकारक बदल झाले आहेत. गावोगावींच्या महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित होत आहेत. हे कार्य अधिक जोमाने होण्यासाठी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले.

‘फॉर्च्युन इंडिया’ मासिकातर्फे देण्यात येणाऱ्या ‘फॉर्च्युन इंडिया १०० मोस्ट पॉवरफुल वूमेन (सर्वाधिक प्रभावी महिला)’ पुरस्काराचा आरंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत १० जुलै रोजी मुंबई येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते ‘फॉर्च्युन इंडिया’ मासिकाच्या नव्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

विविध क्षेत्रात नेतृत्वस्थानी असलेल्या महिलांना संबोधित करताना, राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले की, महिला स्वयंसहायता गटांमुळे स्वतःच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून इतरांना देखील प्रोत्साहन देणाऱ्या महिला अनेक ठिकाणी उदयास आल्या आहेत.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा पुढे म्हणाले की, पूर्वी बँकेत जाण्यास देखील घाबरणाऱ्या त्रिपुरा येथील एका ग्रामीण महिलेने कालांतराने स्वतः अधिकाऱ्यांसमोर आत्मविश्वासाने पॉवर पॉईंट सादरीकरण केले. त्यावेळी सर्व उपस्थित आश्चर्यचकित झाले होते. ती महिला ‘बँक सखी’ म्हणून आज अनेक महिलांना मदत करीत आहे. महिलांकडील अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण (एनपीए) १ टक्क्यापेक्षाही कमी आहे. महिलांकडे गेलेला पैसे सुरक्षित असतो, असे सांगितले.

शेवटी राज्यपाल जिष्णू देव वर्मा पुढे म्हणाले की, देशातील ५० टक्के नागरिक महिला असल्यामुळे त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करून ‘विकसित भारता’चे लक्ष्य साध्य करता येणार नाही. त्यामुळे समाजातील शेवटच्या स्तरावरील महिलेपर्यंत पोहोचून तिचे सक्षमीकरण झाले पाहिजे, असे सांगितले.

महिला केवळ परिवर्तनाच्या अग्रस्थानी : अनुप्रिया पटेल

आज महिला तळागाळापासून तर उद्योग जगतातील मोठमोठ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत. विकास प्रक्रियेत त्या केवळ सहभागी होत नसून परिवर्तनाच्या अग्रस्थानी आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी यावेळी केले.

यावेळी त्यांनी उपस्थितांना केंद्र शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याची माहिती दिली. मातेचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच माता मृत्युदर कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आल्याचे सांगून त्यांनी ‘नारीशक्ती वंदन’ अधिनियम व ‘पोषण अभियान’ उपक्रमाची माहिती दिली.

गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून महिलांचे रक्षण करण्यासाठी केंद्र शासनातर्फे एचपीव्ही लस देण्यात येत असल्याचे सांगून त्यांनी ‘आयुष्मान भारत’ योजना, ‘जनऔषधी औषधालये, लखपती दीदी, नमो ड्रोन आदी योजनांची माहिती दिली.

सुरुवातीला राज्यपालांच्या हस्ते ‘फॉर्च्युन इंडिया’ मासिकाच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. आरपी संजीव गोयंका समूहाचे उपाध्यक्ष शाश्वत गोयंका यांनी प्रास्ताविक केले तर ‘फॉर्च्युन इंडिया’चे मुख्य संपादक सौरव मुजुमदार यांनी आभारप्रदर्शन केले.

उदघाटन सत्राला नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान, रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, कॉर्पोरेट लॉ फर्म एझेडबी अँड पार्टनर्सच्या सह संस्थापिका झिया मोदी, नीरजा बिर्ला यांसह उद्योग, व्यवसाय, बँकिंग क्षेत्रातील प्रभावी महिला उपस्थित होत्या.

About Editor

Check Also

आयआयटी बॉम्बे मधील विद्यार्थी साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन IIT Bombay मधील जाति-आधारित छळाच्या आरोपांची सखोल चौकशी करा, प्रा. सुर्यनारायण डुल्लांना बरखास्त करा: झीनत शबरीन

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्ये प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आयआयटी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *