मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, महाराष्ट्रातील मराठा मुंबईत येण्याआधी निर्णय घ्या अजूनही वेळ गेलेली नाही

मराठा आरक्षण प्रश्नी आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा आज चवथा दिवस आहे. आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर आंदोलक मुंबईतील आझाद मैदानावर आधीच आलेले आहेत. तर आणखी आंदोलक येत आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई आणि दादर-कुर्ला पर्यंतच्या परिसरात मराठा आंदोलक लोकल आणि रस्त्याने फिरताना दिसत आहे. तर अनेक आंदोलक सीएसएमटी आणि नरिमन पाँईट येथील मंत्रालय, चर्चगेट आणि विधान भवन आदी परिसरात फिरताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस जी अद्याप वेळ निघुन गेलेली नाही. महाराष्ट्रातील मराठा समाज अद्याप मुंबईत आलेला नाही. ते सर्वजण जर मुंबईत आले तर गाड्यांना सोडाच उभा राहिलाही जागा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे लवकर निर्णय घ्या असे आवाहन यावेळी केले.

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही कायदा सोडून कुठेही काहीही केलेले नाही. आम्ही चार महिन्यापूर्वी सरकारला निवेदन दिले आहे. सरकारने त्याची दखल घेतलेली नाही. याचिकाकर्ते सरकारवर का बोलत नाही. सरकारमुळे मुंबईची शांतता बिघडली असे याचिकाकर्त्ये का बोलत नाहीत असा सवाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोळ्या जरी घातल्या तरीही मी आझाद मैदानावरून उठणार नाही, निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्या शिवाय मी मुंबई सोडणार नाही असा निर्धारही यावेळी व्यक्त केली.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री साहेब तुमच्या हातातील वेळ अद्याप गेलेली नाही. महाराष्ट्र मुंबईकडे निघणार आहे. आणखी वेळ आहे. त्या आधीच तुम्ही निर्णय घ्या , ते जर मुंबईत आले तर कुठेच उभा राहण्यासाठी जागा राहणार नाही. कारण ती मोठ्या संख्येने येणार आहेत. म्हणून मी म्हणतोय तुम्ही गाफील राहु नका,या आंदोलनामागे कोणीच नाही, याचं काही होत नाही, आम्ही आरक्षण देत नाही. प्रत्येकवेळी तुम्ही बांधलेला अंदाज चुकत आला आहे. माझा समाज मला आयुष्यभर सोडणार नाही. माझ्यासाठी लोक पक्षाला लाथ मारू शकतात असेही यावेळी सांगितले.

मागील काही दिवसांपासून मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांकडून होत असलेल्या त्रासाच्या विरोधात काही जणांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे थेट तक्रार करण्यात आली, त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही. माझ्या पोरांची काही चूक होत नाही. आम्ही दोन वर्षापासून आरक्षण मागत आहोत. माझ्या जातीची काही चूक नाही. माझ्या जातीला तुम्ही इतके वेड्यात काढता का असा सवालही यावेळी केला. आमचे आरक्षण असूनही दिले जात नसल्याचा आरोप केला.

मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मी एक महिना आधी मी सांगितले होते, देवेंद्र फडणवीस पोलिसांचा वापर कार्यकर्ता म्हणून करतोय. त्यांचे काही लोक आमच्यात घूसवून ते हुल्ल़डबाजी करणार आणि आमच्या आंदोलकांवर खापर फोडणार. ते आमचे कार्यकर्त्ये नाहीत. त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस असणार आहे. काही जातीय पोलिस मराठा पोरांना उसकावून आरक्षण मिळणार नाही. तुम्ही उड्या हाणा काही पोलिस गाड्या अडवा मग आरक्षण मिळेल असे पोरांना सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे नाव सांगून पोलिस वाहने अडवत आहेत. काही रूमाल बांधत आहेत असले प्रकार घडत आहेत. त्यामुळे माझ्य़ा एकाही पोराला लागेल तर पुन्हा महाराष्ट्र कधीच सुरु होऊ देणार नाही, एकाही पोराला काठी लागली तर मुंबईसह महाराष्ट्र पुन्हा कधी सुरु होऊ देणार नाही असा इशाराही यावेळी दिला.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सांगतोय तुमचा एक डिएसपी आहे तो दंगल पेटावी म्हणून आंदोलकांच्या कॉलर धरतोय, कॉलर धरल्यावर धरल्यावर ढकलून दिल्यावर राग येतो, उगाच असले प्रकार करू नका. लई पश्चाताप होईल, तो जो कुणी डीएसपी असेल त्याला सांगा, असा इशारा देत आमच्या जालना येथून पोलिस अधिकारी आलेत त्यांना पुन्हा गावाला पाठवून द्या, जातीयवादी असणाऱ्यांना पहिले इथून काढून टाका अशी मागणीही यावेळी केली.

मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्येकवेळी तुम्ही बांधलेले अंदाज चुकत आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्याबद्दल आयुष्यात कधीही विचार करू नका मी विचित्र रसायन आहे. माझा समाज मला आयुष्यात कधीही सोडू शकत नाही. त्यासाठी तो पक्षाला लाथ मारू शकतो. एवढा समाज माझ्यावर प्रेम करतो. तुमच्या एका चुकीमुळे देशाला डाग लागू शकतो तुमच्या आठमुठेपणा, बालिशपणामुळे आणि द्वेषाने भरलेल्या बुद्धीमुळे देशाला डाग लागू शकतो. नरेंद्र मोदी, अमित शाह यांना डाग लागू शकतो, तो लागू देऊ नका कारण पुढचा काळ अवघड होईल असा इशाराही यावेळी दिला.

शेवटी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, हैद्राबाद गॅझेट सरकार मान्य करत असेल तर त्याचा मला आनंदच आहे. पण मला हैद्राबादबरोबर सातारा संस्थानच्या गॅझेटची अंमलबजावणीची मागणी आहे. तसेच बलिदान दिलेल्या कुटुंबियांच्या वारसाला नोकरी आणि आर्थिक मदत हवी, मराठा आणि कुणबी एकच आहेत तो शासन निर्णय मला पाहिजे, मी यापैकी एकही गोष्ट सोडणार नाही. सगेसोयरेबाबत अधिसूचना काढणार होते, त्याचे काय झाले ते देखील कळायला हवे अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

मुंबईतील मोहरमच्या मिरवणूकीत विषाने भरलेल्या कॅप्सुलच्या माध्यमातून, मोठा घातापाताचा कट उंदिर मारण्याच्या विषाने भरलेली १४ हजार ९०० कॅप्सूल केली जप्त

मुंबई पोलिसांनी एका संशयिताकडून विष भरलेल्या १४,९०० कॅप्सूल जप्त करून मोहरमच्या मिरवणुकीला लक्ष्य करण्याचा कथित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *