संविधानाच्या सन्मानासाठी उद्या शिवाजी पार्कवर लाखोंचा जनसागर उसळणार प्रकाश आंबेडकर करणार प्रमुख मार्गदर्शन, Gen Z सह फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग असणार

भारतीय संविधानाचे संरक्षण, संविधानिक मूल्यांची जपणूक आणि लोकशाही व्यवस्थेच्या सन्मानासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे ‘संविधान सन्मान महासभे’चे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या या महासभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या महासभेला महाराष्ट्रासह देशभरातील संविधानप्रेमी, फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे यांनी दिली.

महासभेच्या आयोजनासंदर्भात मंगळवारी दुपारी १ वाजता आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता लेन, दादर पूर्व, मुंबई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे, वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्ष सागर गवई आणि वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेश अध्यक्षा स्नेहल सोहनी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चेतन अहिरे म्हणाले की, मागील वर्षी आयोजित करण्यात आलेल्या संविधान सन्मान महासभेपासून आजपर्यंतच्या काळात संविधान आणि संविधानिक संस्थांवर झालेल्या आघातांना वंचित बहुजन आघाडीने सातत्याने लोकशाही मार्गाने उत्तर दिले आहे. संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार, स्वायत्त संस्थांचे अस्तित्व आणि लोकशाही मूल्ये धोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानानुसार चालेल, मनुवादानुसार नाही, हा संदेश पुन्हा एकदा देशभर पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

२५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत केलेले शेवटचे भाषण भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. बाबासाहेबांनी मांडलेल्या विचारांनुसार आजही प्रत्यक्ष कृतीतून काम करणारे नेतृत्व म्हणून ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असल्याचे अहिरे यांनी नमूद केले.

महासभेच्या तयारीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, शिवाजी पार्क येथे सभेची तयारी युद्धपातळीवर सुरू असून बुधवार दुपारी १२ वाजेपर्यंत संपूर्ण तयारी पूर्ण होईल. या सभेत संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात येणार असून तिरंगी झेंड्यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या महासभेत Gen Z अर्थात नव्या पिढीतील तरुणांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या महासभेसाठी सत्ताधारी पक्षातील संविधानप्रेमी नेत्यांसह विरोधी पक्षांतील नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. संविधानाच्या समर्थनार्थ भूमिका मांडणाऱ्या सर्वांनी या व्यासपीठावर यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. निमंत्रित पाहुणे आणि वक्त्यांची अंतिम यादी बुधवार दुपारी १२ वाजेपर्यंत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सादर करण्यात येणार असे त्यांनी सांगितले.

शिवाजी पार्कवर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांचे आयोजन होत असते. मात्र, भारतीय संविधानाच्या सन्मानासाठी सातत्याने महासभा आयोजित करण्याची परंपरा वंचित बहुजन आघाडीने निर्माण केली आहे. संविधानाचा आधार देशातील प्रत्येक नागरिक घेतो. त्यामुळे संविधानाचे महत्त्व आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वांपर्यंत पोहोचविणे हा या महासभेचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.

या महासभेत महाराष्ट्रातील संविधानप्रेमी नागरिक, फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, महिला, युवा आणि Gen Z पिढीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश, वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई प्रदेश आणि वंचित बहुजन युवा आघाडी मुंबई प्रदेश यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

एमएमआरडीएकडून मुख्यमंत्री फडणवीस समोर सादरीकरण, मुंबईच्या वाहतूक कोंडी कमी होणार पूर्व-पश्चिम जोडणीसाठी एकात्मिक बोगदा प्रणाली (पाताल लोक) आणि उत्तन ते विरार या मार्गाचा सुधारित आराखडा सादर

मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास वेगवान आणि अखंड करण्यासाठी वांद्रे-वरळी सागरी सेतूपासून ते वांद्रे-कुर्ला संकुल ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *