तर सुपरस्प्रेडर भाजपा नेत्यांच्या मुसक्या आवळा नीती आयोग अनीतीमान शंखासूर भाजपा नेत्यांना समज कधी देणार ?

मुंबई: प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ६० लाख रुग्णसंख्या होण्याची शक्यता आहे. नीती आयोगानेही तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असतानाही सत्तेच्या हव्यासापोटी आंधळा झालेल्या महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष पुन्हा मंदिरांचे राजकारण करत आहे. नीती आयोग अनीतीमान शंखासूर भाजपाला समज कधी देणार ? असा सवाल उपस्थित करत काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्वार्थी राजकारणाकरिता जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्या भाजपाच्या सुपरस्प्रेडर नेत्यांनी ऐकले नाही व नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांनी कुठलीही दया न दाखवता मुसक्या आवळाव्यात असे आवाहन केले.

राज्यातील मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी शंखनाद आंदोलन हाती घेतलेल्या भाजपाचा खरपूस समाचार घेत सावंत पुढे म्हणाले की, कालच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रात उत्सवावर निर्बंध घालावेत असा निर्देश दिला आहे तर आज केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनीही कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनासंदर्भात केंद्र सरकारने घातलेले निर्बंधही ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आले आहेत. केंद्रातील मोदी सरकार राज्य सरकारांना कोरोना वाढणार नाही यासाठी कडक उपाययोजना करण्यासाठी उत्सवांवर निर्बंध घाला असे सांगत असताना त्यांच्याच पक्षाचे राज्यातील नेते मात्र गर्दी जमवणारे उत्सव, दहिहंडी, मंदिरे उघडा यासाठी महाराष्ट्रात आंदोलनाची भाषा करत आहेत. ‘जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनालाही राज्यातील भाजपा नेते हरताळ फासत आहेत.

कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसतानाही जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून गर्दी जमवली जात आहे. या यात्रेदरम्यान कोरोना नियमांच्या उल्लंघनाबाबत गुन्हे दाखल होऊनही भाजपाचे डोके ठिकाणावर आलेले नाही. दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढण्यासाठी भाजपाचे पश्चिम बंगालमधील सत्तेचे राजकारण कारणीभूत ठरले. आता तिसरी लाट लवकर आणण्यासाठी मंदिरे उघडणे व दहिहंडी आयोजनाचा हट्ट करत आहेत. लोकांच्या जीवाची पर्वा न करता राजकीय हेतूने गर्दी जमवून हजारो लोकांचे जीव धोक्यात घालण्याचे काम भाजपा नेते करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदी पनौती तर मुख्यमंत्री फडणवीस खोटारडे, पेट्रोल डिझेल आहे तर पंपावर रांगा कशासाठी ? पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे दादरमध्ये मोठे आंदोलन व रास्ता रोको

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *