राज्य उर्दू साहित्य अकादमी यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करत असून सुवर्ण महोत्सवी वर्षात फक्त १ कोटी २० लाख इतक्या अत्यल्प निधीवर बोळवण करत महायुती सरकारने वचनभंग केला. राज्य सरकार अल्पसंख्याक समाजाच्या संस्थांना जाणिवपूर्वक भेदभावाची वागणूक देत आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी केला. तसेच उर्दू अकादमीला ५० कोटी रूपयांचा निधी द्यावा, अशी मागणीही आमदार शेख यांनी केली.
यासंदर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, गुरुवारी शासन निर्णयाव्दारे उर्दू साहित्य अकादमीला सुवर्ण महोत्सवाचे कार्यक्रम आयोजन करण्यासाठी १ कोटी २० लाख रुपये आणि अकादमीच्या आस्थापना खर्चासाठी ११ लाख ७६ हजार इतका अत्यल्प निधी वितरीत केला.
आमदार रईस शेख यावेळी बोलताना म्हणाले की, तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबरोबर माझी ८ जुलै रोजी बैठक झाली होती, त्या बैठकीत अकादमीसाठी ५० वर्षाच्या मुदतीमध्ये ५० कोटीचा स्थायी निधी ठेवण्यात येईल. तसेच दरवर्षी अकादमीला ५ कोटी रुपये अनुदान देण्यात येईल, अशी हमी देण्यात आली होती. विद्यमान अल्पसंख्याक मंत्री माणिकराव कोकाटे यांना ऑगस्ट मध्ये पत्र पाठवून अकादमीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे विविध कार्यक्रम करण्यासाठी ५० कोटी निधी देण्याची मागणी केली होती.
पुढे बोलताना रईस शेख पुढे म्हणाले की, काल प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये अल्यल्प निधी देवून बैठकीतील सर्व तरतुदींना राज्य शासनाने हरताळ फासला आहे. महाराष्ट्रात उर्दू भाषकांची संख्या ७५ लाख असून २५ उर्दू दैनिके प्रकाशित हेातात. उर्दू ही हिंदुस्थानी जबान आहे. उर्दू साहित्य अकादमी यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना तुटपुंजा निधी देवून अल्पसंख्याक समाजाला महायुती सरकार सापत्न वागणूक देत असल्याचे पुन्हा अधोरेखीत झाले आहे. यासदंर्भात आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दाद मागणार असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya