संसदीय विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन संसदीय कार्य विभागाच्या प्रकाशित माहितीपुस्तिका सुशासनासाठी उपयुक्त ठरणार

संसदीय कार्य विभागाची स्थापना १ जुलै १९७५ रोजी झाली. सुरुवातीला सामान्य प्रशासन विभागाचा भाग असलेला हा विभाग ८ जानेवारी २०१६ रोजी स्वतंत्र विभाग म्हणून अस्तित्वात आला. राज्य शासन आणि विधानमंडळ यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करणाऱ्या या विभागाने ५० वर्षे पूर्ण केली असून, विभागाने स्व-मार्गदर्शिका प्रकाशित करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या संसदीय कार्य विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी तीन महत्त्वपूर्ण मार्गदर्शक पुस्तिकांचे प्रकाशन मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, संसदीय कार्य विभागाचे सचिव सतीश वाघोले, सहसचिव प्रभाकर पवार, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तसेच तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकसित महाराष्ट्र विकसित भारत’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी प्रशासनात सुशासन असणे अत्यावश्यक आहे. या पुस्तिकांमुळे नवीन अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना विधानमंडळाचे कामकाज समजून घेणे अधिक सुलभ होईल. प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी संसदीय कार्य विभागाचे सचिव सतीश वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पुस्तिका तयार केल्या आहेत. विभागात नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल, ज्यामुळे कामकाजात गती आणि अचूकता येईल, असा विश्वास ही व्यक्त केला.

प्रकाशित झालेल्या तीन पुस्तिकांची वैशिष्ट्ये :

१. विधानमंडळ कामकाज हाताळताना घ्यावयाच्या दक्षता :

विधानमंडळाच्या कामकाजात कालानुरूप झालेल्या बदलांचा विचार करून १६ जानेवारी २०२६ रोजी काढलेल्या सुधारित शासन निर्णयाचा समावेश या पुस्तिकेत करण्यात आला आहे. तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, कपात सूचना आणि अर्धा तास चर्चा यांवर किती दिवसांत व कशाप्रकारे कार्यवाही करावी, याबाबत अचूक मार्गदर्शन सर्व मंत्रालयीन विभागांना देण्यात आले आहे.

२. संसदीय कार्य विभाग माहिती पुस्तिका :

या पुस्तकात विभागाची रचना, कार्यप्रणाली आणि दैनंदिन कामकाजाचा सविस्तर आराखडा दिला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाची तयारी करण्याची पद्धत तसेच अशासकीय विधेयके हाताळण्याची प्रक्रिया यांची माहितीही यात समाविष्ट आहे.

३. सार संग्रह :
संसदीय कार्य व सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले महत्त्वाचे शासन निर्णय आणि परिपत्रके या पुस्तकात एकत्रित करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासकीय निर्णय घेताना आवश्यक संदर्भ कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

About Editor

Check Also

विधान परिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी डॉ प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठीही निवडणूक

महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे होणाऱ्या नऊ जागांकरिता भारत निवडणूक आयोगाने द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *