मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधानांना भेटून करणार

सेंट्रल व्हिस्टा या संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या शपथग्रहण समारंभानंतर महाराष्ट्र सदनात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली. संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी तसेच महाराष्ट्र सदनात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्यात यावा, या मागणीसाठी राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन आपणास निवेदन दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

इंडिया गेट परिसरात बांधण्यात येत असलेल्या संसदेच्या नवीन इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यात यावी या संदर्भात आपण स्वत: आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून या मागणीसंदर्भात निवेदन देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

या मागणीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसविण्याची मागणीही राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील उमेदवारांसाठी महाराष्ट्र सदनात निवास व्यवस्था

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील उमेदवारांची दिल्लीत राहण्याची गैरसोय होऊ नये, या संदर्भात कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात तत्काळ १०० ते १५० उमेदवारांच्या निवास व्यवस्थेसह येत्या काळात या सदनातील भूखंडावर ५०० ते ६०० उमेदवारांची  व्यवस्था करण्यासंदर्भात आराखडा तयार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला केल्या असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *