शिवसेना उबाठाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार म्हंटल्यावर एकनाथ शिंदे यांची शिवसेना कुठे दसरा मेळावा घेणार अशी चर्चा सुरु झाली. आधी शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा वरळीच्या डोममध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु नंतर ऐनवेळी हा दसरा मेळावा गोरेगांव मधील नेस्कोच्या मोठ्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. त्यामुळे शिंदे यांचे शिवसैनिक पावसात भिजले नाहीत. परंतु उद्धव सेनेचे शिवसैनिक पावसात भिजले. मात्र भाषण संपेपर्यंत जागा सोडली नाही.
मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत सुरुवात केली. घरात बसून आणि फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवलं. त्यांच्या हातून कधी काही देणं होतं का ते कालही देत नव्हते आजही देत नाहीत आणि उद्याही देणार नाहीत. पण हे सरकार देणाऱ्याचं सरकार आहे. या सरकारने प्रत्येकवेळी राज्यातील जनतेसाठी तिजोरी खुली केली आहे. त्यांनी आम्हाला शिकवू नये असा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करत हा एकनाथ शिंदे कधी फेसबुक लाईव्ह करणारा नाही, तर संकटसमयी लोकांच्या मदतीला धावणारा आहे. मराठवाड्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आधी मदतीचे ट्रक आणि टेम्पो पाठविले आणि नंतर मी आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना गेलो. पण ते गेले रिकाम्या हातानं आणि रिकाम्या हातानं परतले अशी खोचक टीकाही यावेळी केली.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आमच्याकडे भलेही घराण्यांचा वारसा नसेल पण आमच्याकडे विचारांचा वारसा आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांनुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत आहोत. त्यामुळेच आम्ही राज्यातील जनतेला फक्त देत आलो आहोत असे सांगत राज्यातील लाडकी बहिण योजना कधीही बंद होऊ देणार नाही अशी घोषणाही यावेळी केली.
एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, महापुरामुळे राज्यातील बळीराजा कोलमडून गेला आहे. आपण त्याच्या पाठीशी आहोत. त्याला कुठल्याही परिस्थितीत अटी आणि शर्ती बाजूला ठेवून कुठल्याही परिस्थितीत मदतीचा हात दिला आहे. लोक सांगत होते की अनेक वर्षात असा पाऊस पडला नाही म्हणून आपण मेळाव्यात लोकांना फक्त आजूबाजूच्या लोकांना बोलाविण्याचा निर्णय घेतला. तसेच बाकीचे सगळे तिकडे मदत करत असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, दसऱ्यावर पुराचं संकट आहे. अशा परिस्थितीत आपण अन्नदात्याच्या मागे उभं राहण्याचं काम शिवसेना करत आहे. पुरात पाऊस वैऱ्यासारखा कोसळला म्हणून यावेळेस सरकार देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल असेही यावेळी सांगितले.
एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेले शेतकरी सरकारकडून मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. ही मदत नक्की मिळणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांना आवाहन करत पुढे म्हणाले की, माझ्या लाडक्या शेतकरी बांधवांना विनंती करतो की, त्यांनी धीर सोडू नये, तुमचे भाऊ इकडे आहेत, टोकांच पाऊल उचलू नका. तुमचं जीवन उदध्वस्त झाले आहे. त्याला उभारी देण्याचं काम शिवसेना आणि महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांचे कष्ट वेदना आम्हाला माहित आहेत आपल्या पूरग्रस्ताची दिवाळी काळी होऊ देणार नाही. मदत दिवाळीच्या आधी दिली जाईल हा एकनाथ शिंदेचा शब्द असल्याचे आश्वासनही यावेळी दिले.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, आपण कुणावर टीका करतोय याचं काही नाहीच अशी टीका करण्याचा अधिकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या मागे एखाद्या पहाडासारखे असून त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राला लाखो-कोटींचा निधी दिला आहे. ऊस उत्पादक शेतकरी संकटात होता तेव्हा अमित शाह यांनी १० हजार कोटी रूपयांचा टॅक्स माफ केला. युपीए सरकारने दहा वर्षात फक्त २ लाख कोटी रूपये दिले. तर १० वर्षात मोदी सरकारने १० लाख कोटी रूपये दिल्याचे सांगत नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुती सुमनं उधळत गुणगाणही केले.
Marathi e-Batmya