हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, फडणवीसांना गृहखातेच काय, महाराष्ट्राचा कारभारही झेपेना; खुर्ची खाली करा गोरेगावमधील नेस्को संकुलातील ड्रग्ज पार्टीची भनक पोलिसांनी कशी लागली नाही; टक्केवारी, हप्ते व ‘वसुली’ एवढ्याच कामासाठी यंत्रणा आहेत का?

मुंबईतील गोरेगावच्या नेस्को संकुलातील लाइव म्युझिक कॉन्सर्टमध्ये दारु व ड्रग्जचा खुलेआम वापर करण्यात आला. ड्रग्जमुळे दोघांचे मृत्यू होईपर्यंत पोलीस व सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या, आता कारवाईचे नाटक सुरु आहे पण मुंबईतील एका भागात चार ते पाच हजार तरुण तरुणांची ड्रग्ज पार्टी होते, याची भनक पोलीसांना कशी लागली नाही. मुंबईतील ही घटना दोन मृत्यूमुळे उघड झाली पण मुंबईतच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यात ड्रग्जचा काळा धंदा सरकारच्या आशिर्वादाने सुरु असून भाजपा महायुतीच्या निर्लज्ज व नालायक सरकारमुळेच महाराष्ट्राची तरुण पिढी ड्रग्जच्या विखळ्यात अडकली, असल्याचा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मुंबई पोलीस व सरकारी यंत्रणाच्या नाकावर टिच्चून अशा ड्रग्ज व दारुच्या पार्ट्या खुलेआम होत आहेत, हे गृहविभाग व सर्व यंत्रणाचे मोठे अपयश आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राची तरुण पिढी ड्रग्जच्या विखळ्यात अडकण्यास भाजपा महायुती सरकारचा आंधळा कारभार जबाबदार आहे. राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यांच्या भावाच्या शेतातच ड्रग्जचा कारखाना सुरु असतो, तो उघड होऊनही थातूर मातूर कारवाई करून प्रकरण दडपले जाते. मुख्यमंत्री फडणवीसही त्याला क्लीन चिट देऊन टाकतात हे अत्यंत गंभीर आहे. राज्यात ड्रग्जचा धंदा खुलेआम सुरु असल्याचे नाशिक, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर येथील घटनांवरून याधीच उघड झाले पण सरकार काही झोपेतून जागे झाले नाही. ड्रग्ज माफिया ललित पाटील असो, नाशिकमधील ड्रग्ज प्रकरण असो वा साताऱ्यातील ड्रग्जचा कारखाना…या सर्वांचे धागेदोरे सरकारमधील बड्या धेंड्यांशी असल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. ड्रग्जने आणखी किती मृत्यू होईपर्यंत फडणवीस सरकार गप्प बसून फक्त क्लिन चिट वाटत बसणार ?

शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, नेस्कोतील चार-पाच हजार विद्यार्थ्यांच्या अशा पार्टीला परवानग्या कोणी दिल्या, सरकार व पोलीस कोणाला पाठीशी घालत आहे, हे समजले पाहिजे. सरकारने पोलीस व सर्व यंत्रणांना फक्त टक्केवारी, हप्ते वसूली करणे व सर्वसामान्य जनतेकडून कायद्याचा गैरवापर करत ‘वसुली’ करणे याच कामाला जुंपल्याचे चित्र महाराष्ट्रभर दिसत आहे. देवेंद्र फडणवीस मोठमोठ्या गप्पा मारत असतात पण फडणवीस यांना गृहखातेच काय महाराष्ट्राचा राज्यकारभारही हाकता येत नाही. जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, पण महाराष्ट्राची ‘वाट’ लावू नका, असे आवाहनही यावेळी केले.

About Editor

Check Also

जयकुमार रावल यांची माहिती, व्हिएतनामशी द्विपक्षीय सहकार्य आणि सबंध वृद्धिंगत करणार व्हिएतनामचे महावाणिज्यदूत ले क्वांग बिएन यांनी मंत्री जयकुमार रावल यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली

महाराष्ट्र हा व्हिएतनामी उद्योगांसाठी पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत असल्याने आर्थिक भागीदारी वाढत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *