ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभचे आयोजन मुंबईत सुरु होणार पारंपरिक देशी खेळांचा महोत्सव

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात मुंबईत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभला बुधवारी कुर्ला येथे  सुरुवात होणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपली संस्कृती आणि परंपरा जागृत ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत असल्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.  कुर्ला येथील जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मैदान केवळ देशी आणि पारंपरिक खेळांसाठी राखीव करण्यात आले आहे. या मैदानाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांचे मैदान असे नामकरण आणि लोकार्पणही याच सोहळ्यात केले जाणार आहे.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली या क्रीडा महाकुंभचे उद्घाटन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांच्या मैदानाचे लोकार्पण होणार आहे. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रीडा महाकुंभात सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करणार आहेत. तसेच ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजित जाधव यांची विशेष उपस्थिती असून येत्या १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान मुंबईकरांना पारंपरिक खेळांचा थरार पाहायला मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संस्कृती रक्षणासाठी केलेले योगदान आपला देश विसरू शकत नाही. त्यांनी दिलेला सांस्कृतिक वारसा जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. मराठी मातीतले आपले पारंपरिक खेळ नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नावे हा क्रीडा महाकुंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

आपले पारंपरिक खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून तो आपला सांस्कृतिक ठेवा ही आहे. काळाच्या ओघात पारंपरिक खेळ दुर्मीळ होत चालले आहेत. नव्या  पिढीला त्या शिवकालीन मर्दानी खेळांची ओळख करून देण्याची वेळ आली असल्याचेही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. या क्रीडा महाकुंभच्या माध्यमातून लेझिम, फुगडी आणि लगोरी, विटी दांडूसह, पावनखिंड दौड, पंजा लढवणे, रस्सीखेच, कुस्ती आणि मल्लखांब यासारख्या शिवकालीन पारंपरिक खेळांना पूनर्वैभव मिळवून देणार असल्याचेही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे. या क्रीडा महाकुंभात सहभागी होऊन आपल्या संस्कृतीचा ठेवा अबाधित ठेवावा, असे आवाहनही मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जनतेला उद्देशून केले आहे.

क्रीडा भारती या संस्थेच्या माध्यमातून मुंबई परिसरातून मोठ्या प्रमाणात या स्पर्धेसाठी नोंदणी सुरु करण्यात आली असून आतापर्यंत १५ हजार पेक्षा जास्त स्पर्धकांनी विविध खेळांसाठी नोंदणी केली आहे. शाळा, आयटीआय आणि महाविद्यालयांनीही क्रीडा भारती यांच्याशी संपर्क केला आहे. दरम्यान ज्या संस्थांना आणि क्रीडा मंडळांना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी ९८६७०६६५०६ अथवा ९७६८३२७७४५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे क्रीडा भारतीकडून सांगण्यात आले आहे. मुंबईमध्ये यापूर्वीही मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावतीने अशा प्रकारच्या पारंपरिक खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या पारंपरिक क्रीडा स्पर्धांना जनतेने दिलेला उदंड प्रतिसाद पाहता आता मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

About Editor

Check Also

शेतकरीविरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली मानेगाव ते जळगाव जामोद पदयात्रा

केंद्रातील व राज्यातील भाजपा महायुतीच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *