राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीन-चार महिन्यापूर्वी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार काल सकाळपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जथ्याने मराठा आरक्षण प्रश्नी आझाद मैदान येथे आंदोलन सुरु करण्यात आले. आज आझाद मैदानावरील आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. एकाबाजूला राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच्या चर्चेला सुरुवात करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी अहिल्यानगर येथे बोलताना मोठे विधान करत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असे सांगून एकच खळबळ उडाली आहे.
अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, तामीळनाडूत आरक्षण वाढू शकतं तर महाराष्ट्रात का नाही असा सवाल करत घटनेत दुरुस्ती करण्याची भूमिका घेतल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटु शकतो असे सांगत राज्य सरकार आणि भाजपाला चांगलेच कोंडीत पकडले आहे.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, आरक्षणाचे असे प्रश्न सोडवायचे असतील तर शेवटी असे निर्णय राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले गेले पाहिजे. यामध्ये केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल. ७२ टक्के आरक्षण तामिळनाडूत होऊ शकतं. तर मग वेळप्रसंगी घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाचा हा तिढा सोडविण्याच्या संबधीचा निर्णय संसदेत घेतला पाहिजे असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आम्ही संसदेच्या काही सदस्यांशी संवाद साधत आहोत. निलेश लंकेही या ठिकाणी आहेत. आमची आणखी काही सहकाऱ्यांची एक बैठकही झाली. जर गरज पडली तर घटनेमध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. ही बाब आपण देशाच्या आणि अन्य राज्यांच्या घटकांना पटवून दिली तर यावर घटनात्मक दुरुस्ती करता येईल. कारण हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही. प्रत्येक राज्यात लहान लहान घटक आहेत. शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे घटनेत दुरुस्ती करण्याची भूमिका घेतल्यास आरक्षणाचा प्रश्न सुटु शकतो असेही सांगितले.
Marathi e-Batmya