खासदार विनायक राऊत यांनी दिली शिंदे-फडणवीसांना ‘काळू-बाळू’ची उपमा ४० जण गेले म्हणजे शिवसेना संपत नाही

शिवसेनेतील फुटीप्रकरणी उद्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. त्याचबरोबर उध्दव ठाकरे गटाकडून आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडत आहेत. आतापर्यत आदित्य ठाकरे, उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील सर्वच नेत्यांनी बंडखोर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना गद्दार म्हणून टीका करत होते. मात्र आज शिवसेनेचे कोकणातील खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळू-बाळू या तमाशा सम्राटांची उपमा देवून टाकली.

यासंदर्भात बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले, सध्या महाराष्ट्रात काळू-बाळूचा तमाशा सुरू असून ज्यांना राष्ट्रगीतासाठी नीट उभं राहता येत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे, अशी खोचक टीका केली.

सांगोल्यात आयोजित शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेत विनायक राऊत बोलत होते.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. बाळासाहेबांच्या नावावर मतं मागणाऱ्या भडभुंज्या लोकांना राज्यातली जनता माफ करणार नाही, असे ही ते म्हणाले.

महाराष्ट्रात काळू-बाळूचा तमाशा सुरू आहे. ज्यांना राष्ट्रगीतासाठी नीट उभं राहता येत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. हे मुख्यमंत्री राष्ट्रगीत सुरू असताना शर्ट खाली-वर करतात. हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्देव आहे, अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

जर तुम्हाला शिवसेनेशी गद्दारीच करायची होती. तर भाजपात जायचे होते. मात्र, या लोकांनी आपली आमदारकी विकली, १२ लोकांना आपली खासदारकी विकली. ४० चोर गेले म्हणजे शिवसेनेचा परिवार संपत नाही असेही त्यांनी सांगितले.

मुंबईत भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांना बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत मनपावर भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे. याचा अर्थ ते आता बाळासाहेबांच्या नावावर मत मागत आहेत. कारण मोदी पर्व संपलं आहे. आता मोदींच्या नावावर मत मिळणार नाही, हे कळलं तेव्हा बाळासाहेबांच्या नावावर मतं मागणं सुरू झाल्याची टीकाही त्यांनी केली.

About Editor

Check Also

सुप्रिया सुळे यांचा सवाल, आयआयटी, आयआयएमची परीक्षा होते, तिथले पेपर का नाही फुटत? एमपीएससी MPSC विद्यार्थ्यांच्या विषय अतिशय गंभीर

एमपीएससी MPSC विद्यार्थ्यांच्या विषय अतिशय गंभीर आहे.,“मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, विषय अतिशय गंभीर आहे. एमपीएससी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *