मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमधील प्रकल्पग्रस्त नागरिक आणि मूळचे आगरी-कोळी समाजबांधव, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी दीर्घकाळापासून करत आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळ आणि राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी (विधानसभा व विधान परिषद) २९ जून २०२२ रोजी एकमताने ठराव मंजूर करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. पण अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही म्हणून जनभावनेचा विचार करून विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची कार्यवाही करावी अशी मागणी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांना यासंदर्भात पत्र लिहिले असून या पत्रात त्या पुढे म्हणतात की, राज्य विधिमंडळाने एकमताने प्रस्ताव मंजूर केल्यानंतरही, नागरी उड्डाण मंत्रालयाकडे यासंबंधीची मंजुरी अद्याप प्रलंबित असणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. विमानतळ कार्यान्वित झालेले असतानाही या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यास होत असलेल्या सततच्या विलंबामुळे, लाखो स्थानिक नागरिक आणि भूमिपुत्र यांच्यात मोठ्या प्रमाणावर असंतोष व नाराजी निर्माण झाली आहे. ही मागणी केवळ एका प्रकल्पाचे नामकरण करण्यापुरती मर्यादित नाही, तर उपेक्षितांचा आवाज बनलेल्या एका राष्ट्रीय नेत्याचे जीवन, त्यांचा वारसा आणि त्यांचे बलिदान यांचा सन्मान करण्याशी, तसेच महाराष्ट्रातील मूळ रहिवासी समुदायांच्या सांस्कृतिक अस्मितेचा आदर करण्याशी संबंधित आहे.
खासदार वर्षा गायकवाड शेवटी म्हणाल्या की, दि. बा. पाटील यांनी आपले संपूर्ण सार्वजनिक जीवन शेतकरी, जमीन गमावलेले लोक, प्रकल्पग्रस्त, आगरी-कोळी समाज आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी अविरत लढा देण्यात व्यतीत केले. शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी योग्य मोबदल्याची मागणी करणारी त्यांची १९८४ मधील ऐतिहासिक चळवळ ‘१२.५% विकसित भूखंड योजने’च्या निर्मितीस कारणीभूत ठरली; ही योजना आजही हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचे रक्षण करत आहे. नवी मुंबई हे त्यांची कर्मभूमी आहे आणि नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव देणे ही स्थानिक जनतेची इच्छा आहे, जनतेच्या या प्रबळ भावनांचा आदर करून तात्काळ निर्णय घ्यावा असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटले.
विमानांमध्ये पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांची सुविधा करा..
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, भारतीय विमान वाहतूक क्षेत्राचा होणारा जलद विस्तार आणि वाढता हवाई प्रवास पाहता, प्रवाशांच्या सोयीसुविधा आणि स्वच्छतेच्या मानकांमध्ये सातत्याने सुधारणा होणे आवश्यक आहे. सध्या, देशांतर्गत विमान कंपन्यांकडून चालवल्या जाणाऱ्या बहुतेक ‘नॅरो-बॉडी’ आणि प्रादेशिक विमानांमध्ये सर्व प्रवाशांसाठी सामायिक अशी ‘जेंडर-न्यूट्रल’ (स्त्री-पुरुष भेद नसलेली) प्रसाधनगृहे उपलब्ध आहेत. प्रवाशांची मोठी वर्दळ, विमानाचा कमी ‘टर्नअराउंड’ कालावधी आणि विमानातील प्रसाधनगृहांचा अतिवापर यामुळे, सामायिक प्रसाधनगृहांमध्ये स्वच्छता राखणे अनेकदा आव्हानात्मक ठरते. यामुळे महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या माता यांच्यासाठी मोठी गैरसोय निर्माण होत आहे.ज्या विमानांमध्ये एकापेक्षा जास्त प्रसाधनगृहे आहेत, त्यातील किमान एक प्रसाधनगृह केवळ महिला प्रवाशांसाठी राखीव किंवा निश्चित करण्यात यावे, अशी मागणी केली.
Marathi e-Batmya