मुंबई पोलिसांचा दबदबा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. शहरात गुन्हेगारी प्रचंड वाढली असून ढासळती कायदा व सुव्यवस्था चिंतेचा विषय बनला आहे. लोकप्रतिनिधी, चित्रपट क्षेत्राताली कलाकार यांचीही सुरक्षा धोक्यात आली असून सामान्य मुंबईकरांकडे कोण लक्ष देणार. जागतिक दर्जाचे शहर अशी ख्याती असलेल्या मुंबईचे जंगलराज झाले असून राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे, अशी टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.
खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त देवेन भारती यांची कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व एक निवेदनही सादर केले. यावेळी माजी मंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, आमदार ज्योती गायकवाड, राजेश शर्मा, चरणसिंग सप्रा, सुरेशचंद्र राजहंस, अखिलेश यादव, वीरेंद्र चौधरी, ट्युलिप मेरिंडा आदी उपस्थित होते.
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला करण्यात आला ही घटना गंभीर आहे. यापूर्वी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली, चित्रपट निर्माता रोहित शेट्टी, सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला. ठाण्यात एका पक्ष पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली. महिला अत्याचार, वाढती गुन्हेगारी यासह IIT बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल वाकोडे प्रकरणावरही यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांची काँग्रेसच्या कार्यालयात घुसून पोलिसांनी धरपकड केली, त्यांना मारहाण करण्यात आल्याचे मुद्देही उपस्थित करण्यात आले. मुंबई पोलिसांची गौरवशाली परंपरा राहिलेली आहे परंतु मुंबई पोलिसांचा पूर्वीसारखा दबदबा राहिलेला नसून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे हे चिंताजनक आहे. मुंबई पोलिसांचा नावलौकिक पूर्वीसारखा राहिला पाहिजे असे खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, IIT बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल वाकोडे प्रकरणी SIT व क्राईम ब्रँच तपास करत आहे, हा तपास पुर्ण झाल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन देवेन भारती यांनी दिले. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांवर काँग्रेसच्या कार्यालयात घुसून पोलिसांनी कारवाई केल्याचे पुरावे द्या, संबंधितावर कारवाई करू, असे आश्वासनही पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिल्याचे सांगितले.
Marathi e-Batmya