संभाजी भिडेवरून संभाजी ब्रिगेडमध्ये फूट ? प्रवीण गायकवाड नव्या ब्रिगेडचे अध्यक्ष

मुंबई : प्रतिनिधी

भिमा कोरेगांव हिंसाचारप्रकरणी अँट्रोसिटी गुन्हा दाखल असलेले संभाजी भिडे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी अँड. प्रकाश आंबेडकर यांनी एल्गार मोर्चा काढला. मात्र संभाजी ब्रिगेडमध्येच संभाजी भिडे यांना माननारा मोठा वर्ग असल्याने एल्गार मोर्चास पाठिंबा देण्यास या वर्गाकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. तर काहीजणांनी एल्गार मोर्चाला पाठिंबा दिल्याने शेकापमध्ये असलेल्या प्रवीण गायकवाड यांनी ब्रिगेडला सोडचिठ्ठी देत वेगळा सवता सुभा मांडल्याची माहिती संभाजी ब्रिगेडमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

दलित समाजाच्या प्रश्नावरून संभाजी ब्रिगेडने नेहमीच पाठिंबा देवू नये अशी भूमिका काहीजणांनी घेतली आहे. त्याचबरोबर संभाजी भिडे हे अप्रत्यक्षरित्या मराठा समाजाला जोडण्याचे काम करत आहे. त्यामुळे भिमा कोरेगांव प्रकरणी त्यांच्या अटकेसाठी दलित समाजाने काढलेल्या मोर्चाला पाठिंबा देवू नये अशी भूमिका भिडे समर्थक ब्रिगेडींनी घेतली आहे. त्यामुळे प्रविण गायकवाड यांनी संभाजी ब्रिगेड या संघटनेपासून वेगळे होत स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडला राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केली आहे. त्यामुळे ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या मंडळींनी स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली आहे. संभाजी ब्रिगेड मुळात एक सामाजिक संघटना होती. प्रवीण गायकवाड आधी या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष होते.पण नंतर अंतर्गत धुसफुसीमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुढे मनोज आखरे या नव्या अध्यक्षांनी ब्रिगेडची नोंद राजकीय पक्ष म्हणून केल्याने यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रवीण गायकवाड यांच्या एका समर्थक कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

आता नव्यानेच तयार झालेल्या या ब्रिगेडच्या अध्यक्षपदी प्रवीण गायकवाड यांची निवड झाली आहे, मात्र या फुटीर गटाने त्यांच्या संघटनेला संभाजी ब्रिगेड हे नाव वापरू नये असा इशारा विद्यमान अध्यक्ष मनोज आखरे यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

याबाबत प्रविण गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

About Editor

Check Also

राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर साहित्य अकादमीतर्फे २०२५चे पुरस्कार जाहिर

साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या २०२५ या वर्षासाठी प्रतिष्ठेच्या  पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील मान्यताप्राप्त २४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *