राहुल गांधी यांचा आरोप, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमित शाह यांनी फायरिंग करण्याचे आदेश दिले कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांवर बळाचा वापर

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याचे अधिकार दिल्याचा आरोप केल्यानंतर बुधवारी लोकसभेत गदारोळ झाला. या आरोपांना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि इतर एनडीए खासदारांनी तीव्र विरोध दर्शवला.

पेपर फुटी प्रकरणी विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, त्यावेळी सभागृहात अनुपस्थित असलेले अमित शाह हे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईसाठी जबाबदार होते.

कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, गृहमंत्र्यांनी आमच्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांच्या रक्तात छर्रे घुसतील अशा पेलेट गनचा वापर करण्यात आला. त्यांनी भारतातील विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्याचे आदेश दिल्याचाही आरोप केला.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, बळाचा वापर केवळ गृहमंत्री किंवा पंतप्रधानच अधिकृतरित्या करू शकतात असाही आरोप केला.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी बाकांवरून तात्काळ निषेध व्यक्त करण्यात आला आणि किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांचे समर्थन करावे अशी मागणी केली. भाजपा आणि एनडीएच्या सदस्यांनी विरोधी पक्षनेत्यावर गृहमंत्र्यांविरुद्ध निराधार दावे केल्याचा आरोप केला. ज्यामुळे सभागृहात घोषणाबाजी झाली आणि काही काळासाठी कामकाज विस्कळीत झाले.

एनडीएच्या खासदारांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आणि त्यांना त्यांच्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे देण्यास सांगितले. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हस्तक्षेप करून विरोधी पक्षनेत्याला आठवण करून दिली की, पुराव्याशिवाय सभागृहात आरोप केले जाऊ शकत नाहीत.

तुम्ही असे कसे म्हणू शकता? हा विरोधी पक्षनेत्याला मिळालेल्या विशेषाधिकाराचा भंग आहे. ते गृहमंत्र्यांवर इतके गंभीर आरोप कसे करू शकतात? गृहमंत्र्यांनी गोळीबाराचे आदेश दिले, हा आरोप तुम्ही कोणत्या आधारावर केला आहे? हा एक निराधार आरोप आहे, असे किरेन रिजिजू म्हणाले.

हा वाद २० जुलै रोजी दिल्लीच्या जंतर मंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनातून निर्माण झाला आहे, जिथे ‘संसद चलो’च्या घोषणेखाली संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलक आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात संघर्ष झाला.

आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पेलेट गन, लाठीचार्ज, अश्रुधूर आणि जमाव नियंत्रणाचे इतर उपाय वापरले, ज्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले.

कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आणि कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्याने आयोजित केलेले हे आंदोलन, नीट (NEET) परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी अधिक पारदर्शक व उत्तरदायी शिक्षण प्रणालीच्या मागणीसाठी होते.

आपल्या भाषणानंतर संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी सांगितले की, पोलीस कारवाईची अंतिम जबाबदारी अमित शाह यांचीच आहे, कारण त्यांनी एकतर या कारवाईला अधिकृत केले होते किंवा ती रोखण्यात ते अयशस्वी ठरले.

राहुल गांधी म्हणाले की, दोन शक्यता असू शकतात. एक म्हणजे गृहमंत्रींनी आदेश जारी केला. दुसरे म्हणजे गोळीबार होणार आहे याची गृहमंत्र्यांना कल्पना नव्हती. पहिल्या प्रकरणात, ते दोषी आहेत; दुसऱ्या बाबतीत, ते अकार्यक्षम आहेत. या दोनपैकी एक असलेच पाहिजे; तिसरी शक्यता नाही. जर गोळीबार होत असल्याची गृहमंत्र्यांना कल्पनाही नसेल, तर याचा अर्थ ते अकार्यक्षम आहेत; अन्यथा, जर त्यांनी तसा आदेश दिला असेल, तर ते दोषी आहेत, असेही म्हणाले.

आपला हल्ला अधिक तीव्र करत राहुल गांधी यांनी आरोप केला की, आरएसएस शिक्षण व्यवस्थेवर प्रभाव टाकत आहे आणि विद्यार्थ्यांनी काय शिकावे हे ठरवत आहे.

“या व्यवस्थेचा आत्मा आरएसएसने काबीज केला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी कधीही शिक्षण मंत्रालय चालवले नाही. जे व्यक्ती आणि संघटना हे मंत्रालय चालवतात, त्यांना आरएसएस म्हणतात,” असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, त्यांना (विद्यार्थ्यांना) आरएसएसच्या या काल्पनिक इतिहासावर विश्वास ठेवावा लागतो. धर्मेंद्र प्रधान हे त्याचे प्रतीक आहेत. तुमचा खरा शत्रू आरएसएस आहे. ते असे लोक आहेत ज्यांना तुम्ही अंधभक्त व्हावे असे वाटते, असा टोलाही यावेळी लगावला.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला, राहुल गांधींनी विद्यार्थ्यांच्या एका गटासोबत झालेल्या संभाषणाची आठवण सांगितली, ज्यामुळे, त्यांच्या मते, तरुण पिढी शिक्षण आणि ज्ञानाकडे कसे पाहते यावर त्यांना एक नवीन दृष्टिकोन मिळाला असल्याचे सांगितले.

राहुल गांधी यांनी सांगितले की, मी त्या मुलीला विचारले की, तू म्हणालीस की तू विद्यार्थिनी आहेस — याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे का की तू कॉलेजमध्ये, शाळेत शिकतेस, पुस्तकं वाचतेस? ती म्हणाली, विद्यार्थी म्हणजे अशी व्यक्ती जिचे मन आणि हृदय खुले असते.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, विद्यार्थी म्हणजे अशी व्यक्ती जी हे स्वीकारते की तिला सर्व काही माहित नाही. तिला जे काही माहित आहे ते नवीन ज्ञानामुळे मागे पडेल. तिला माहित आहे की विश्व गतिशील आहे. तिला हे देखील समजते की ज्ञान सतत बदलत असते. ती म्हणाली, विद्यार्थ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे नम्रता, असे ते म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, त्या विद्यार्थिनीने पुढे अशा लोकांच्या दुसऱ्या गटाचे वर्णन केले ज्यांना वाटत होते की त्यांना आधीच सर्व काही माहित आहे.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, त्यांना पूर्ण खात्री आहे की त्यांना सर्व काही माहित आहे. त्यांचा असा विश्वास आहे की विश्व स्थिर आहे आणि ज्ञान त्यांच्या आतूनच प्रकट होते. ते अहंकारी आहेत. ते ऐकत नाहीत, ते इतरांच्या सत्याचा आदर करत नाहीत, असे म्हणाले आणि त्यांनी वापरलेल्या एका शब्दावर अध्यक्षांनी ‘असंसदीय’ म्हणून आक्षेप घेतला.

या वक्तव्यामुळे सभागृहात गदारोळ झाला, त्यामुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना त्यांचे भाषण चर्चेच्या विषयापुरते मर्यादित ठेवण्यास सांगितले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही या शब्दप्रयोगाला “असंसदीय” ठरवून आक्षेप घेतला.

राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की ते केवळ एका विद्यार्थ्याचे उदाहरण देत होते, सभागृहाच्या कोणत्याही सदस्याचा उल्लेख करत नव्हते. त्यानंतर ओम बिर्ला यांनी असंसदीय वक्तव्य कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले.

राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यासोबत झालेल्या संवादाचा आणखी एक भाग सांगितला. ते म्हणाले की, त्या किशोरवयीन मुलाने त्यांना सांगितले की, विद्यार्थ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते “सत्य आपल्या छातीवर मिरवतात”, तर दुसऱ्या वर्गातील लोकांना एक प्रतिमा तयार करण्याची गरज वाटते. ती प्रतिमा खरी नाही, कारण … स्वतःला देव असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणून त्याला ही प्रतिमा तयार करावी लागते, राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, जेव्हा त्यांनी विद्यार्थ्याला तिसऱ्या वर्गाबद्दल विचारले, तेव्हा उत्तर आले: “अंधभक्त – ज्याला पूर्ण खात्री असते की … देव आहे.

राहुल गांधी म्हणाले की, ही चौकट एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने मांडली होती आणि त्यांनी असा युक्तिवाद केला की, सध्या सुरू असलेली आंदोलने जरी परीक्षांवर केंद्रित असली तरी, ती देशाच्या शिक्षण व्यवस्थेबद्दलच्या अधिक गंभीर चिंता दर्शवतात.

About Editor

Check Also

Artificial Intelligence name changed to Super Intelligence

Super Intelligence : एआयचे नाव बदलले! आता ते या नावाने ओळखले जाईल मस्क, पिचाई आणि झुकरबर्ग यांच्या उपस्थितीत ट्रम्प यांचा मोठा निर्णय

Super Intelligence: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मोठ्या आणि ऐतिहासिक निर्णयावर स्वाक्षरी केली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *