१४ जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे, आणि किमान १५ जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे १४ जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते ४५ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे, तर विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान ४० अंशापेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि खान्देशातील अनेक भागात कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास राहण्याचा अंदाज देखील आहे.

१४ जूनपर्यंत राज्यात सार्वत्रिक आणि मान्सूनचा पाऊस अपेक्षित नाही. पाऊस हा प्रामुख्याने दुपार नंतर आणि मेघ गर्जनेसह काही भागातच पडेल, ज्याची शक्यता या आठवड्याच्या सुरुवातीला दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य-महाराष्ट्रात अधिक राहील. तुलनेत राज्यातील इतर भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

या दरम्यान कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

About Editor

Check Also

२९ ते ३१ जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज विदर्भ, उत्तर मराठवाडा, खान्देश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर

बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत २९ ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *