शरद पवार यांनी केंद्राला पत्र लिहीत म्हणाले, आयात नको शेतकऱ्यांना फटका बसेल… दुग्धजन्य पदार्थांची आयात नको

दुग्धजन्य पदार्थांची परदेशातून आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसेल अशी भीती व्यक्त करतानाच या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला लिहिले आहे.

शरद पवार यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. वर्तमानपत्रात यासंदर्भात प्रसिध्द झालेल्या बातमीचा दाखलाही त्यांनी दिला आहे. कोरोना महामारी आणि त्यानंतर आलेल्या लम्पी आजारामुळे देशातील दूध उत्पादन घटले आहे. घी, लोणी अशा दुग्धजन्य पदार्थांची टंचाई निर्माण झाली आहे. दुसरीकडे देशामध्ये या पदार्थांची मागणी गेल्या वर्षभरात ८ ते १० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे दक्षिण हिंदुस्थानातील राज्यांमधील दूध उत्पादनाचा आढावा घेऊन हे दुग्धजन्य पदार्थ परदेशातून आयात करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय पशूपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय (पदुम) विभागाचे सचिव राजेश कुमार सिंग यांनी म्हटल्याचे या बातमीत नमूद आहे.

शरद पवार यांनी केंद्रीय पदुम मंत्री पुरूषोत्तम रुपाला यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी असे नमूद केले आहे की, ‘दूध उत्पादक शेतकरी नुकताच कोविडच्या संकटातून बाहेर पडला आहे. दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याचा निर्णय घेतला गेला तर त्या शेतकऱ्याला मोठा फटका बसेल. डेअरी क्षेत्राचेही मोठे नुकसान होईल. त्यामुळे आपण स्वतः यामध्ये लक्ष घालावे आणि अशा प्रकारचा निर्णय घेतला जाणार नाही याची काळजी घ्यावी.’ आपण व्यक्त करत असलेल्या चिंतेची गांभीर्याने दखल घ्यावी असेही पवार यांनी त्यात म्हटले आहे.

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांची माहिती, शेती व्यवसाय करताना मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना करणार असल्याचे कृषीमंत्री यांचे विधानसभेत उत्तर

शेतकरी सक्षमीकरण, कर्जमुक्ती, हवामान बदलाशी सामना, कृषी पायाभूत सुविधा, पीक विमा, कृषी यांत्रिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांसह विविध विषयांवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *