रहेजा कार्लाइन इमारतीला भीषण आग लागून ७ मजल्यांचे नुकसान इमारतीतील ५० रहिवाशांना सुखरूप वाचवण्यात प्रशासनाला यश, कोणतीही जीवितहानी नाही

रहेजा गार्डन मधील रहेजा कार्लाइन या १७ मजली इमारतीतील रहिवाशांसाठी कालची दिवाळीची रात्र ही काळ रात्र ठरली. संध्याकाळी ८.३० वाजता या इमारतीच्या ८ व्या मजल्यावरील घराला भीषण आग लागली, पाहता पाहता ही आग १४ व्या मजल्यापर्यंत पसरली. या आगीमध्ये अडकलेल्या ५० रहिवाशांची रात्री उशिरा सुखरूप सुटका करण्यात आली.

रहेजा कार्लाइन इमारतीला लागलेल्या आगीची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल आणि ठाणे महानगरपालिकेच्या टीडीआरएफ पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. दरम्यान या आगीबद्दलची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक हेदेखील घटनास्थळी पोहोचले. यानंतर आगीमुळे वरच्या मजल्यावर अडकलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच शक्य त्यांनी इमारतीच्या रिफ्युजी एरिया मध्ये तर उर्वरित नागरिकांना इमारतीच्या गच्चीत जाऊन थांबण्यास सांगण्यात आले.

दरम्यान, अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून काही तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. त्यानंतर इमारतीत अडकून पडलेल्या नागरिकांना शिडी आणि स्ट्रेचरच्या माध्यमातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. आगीमुळे धूर निर्माण झाल्याने इमारतीची लिफ्ट वापरता येत नव्हती. मात्र रात्री उशिरापर्यंत या इमारतीत अडकलेल्या सर्वच्या सर्व ५० रहिवाशांना तसेच त्यांचे कुत्रे, मांजर अशा पाळीव प्राण्यांना देखील सुखरूप वाचवण्यात आले.

ही आग नक्की फटाक्यामुळे लागली का शॉर्ट सर्किटमुळे लागली याचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे. मात्र वेळीच मदत मिळाल्याने आणि ठाणे अग्निशमन दल आणि टीडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता ही आग आटोक्यात आणता येणे शक्य झाले. या बचावकार्यात अग्निशमन पथकाने अत्याधुनिक ड्रोनचा वापर केल्यामुळे रहिवाशी नक्की कोणत्या मजल्यावर अडकून पडले आहेत ते शोधणे शक्य झाल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.
वेळीच मदतीला धावून येत नागरिकांना सुखरूप सुटका केल्याबद्दल रहेजा गार्डन मधील रहिवाशांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, आमदार निरंजन डावखरे, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले जाधव, नगरसेविका मीनल संख्ये यांच्यासह ठाणे मनपा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी अग्निशमन दलाचे अधिकारी, टीडीआरएफ पथकांचे कर्मचारी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यात हवेत उडणारे फटाके आणि रॉकेट्स उडवण्यास मनाई

ठाणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल घडलेल्या विविध आगीच्या घटना पाहता, या आगी लागण्यामागील अनेक कारणांपैकी हवेत उडणारे फटाके हे कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात हवेत उडणारे फटाके, रॉकेट्स उडवण्याला मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल काल रात्री उशिरा जाहीर केले आहेत. हे मनाई आदेश आजपासून पुढील तीन महिन्यासाठी लागू राहतील.

या अंतर्गत मोठ्या इमारतीचा परिसर, पार्किंग, मोकळ्या जागा अशा ठिकाणी हवेत उडणारे फटाके वाजवण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा अंमलबजावणीसाठी नकार देणाऱ्या व्यक्ती, समूह अथवा संस्थेविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी नुसार कठोर कारवाई करण्यात येईल. सदर आदेशाची अंमलबजावणी स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि प्रशासनाला करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

About Editor

Check Also

आदेश उच्च न्यायालयाचा, जनहितार्थ व्हिडीओ बीएमसीचा तर टीका सगळी भाजपा नेत्यांची अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या व्हिडीओवर भाजपा नेत्यांची टीका

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी अभिनेत्री दिया मिर्झाची निवड केली होती. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *