दत्तात्रय भरणे यांची माहिती, कृषी दिनानिमित्त १८९ पुरस्कारार्थ्यांचा होणार गौरव कृषी दिनानिमित्त राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळा-२०२६

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दिनांक १ जुलै २०२६ रोजी डोम, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी, मुंबई-१८ येथे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सन २०२३ व २०२४ या वर्षांतील राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार असून कृषी, कृषि संलग्न क्षेत्र, फलोत्पादन, सेंद्रिय शेती, कृषी विस्तार व कृषी विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण १८९ शेतकरी, संस्था व कृषी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले, राज्यमंत्री(कृषी) अॅड.आशिष जयस्वाल, राज्यमंत्री(मृद व जलसंधारण ) इंद्रनील नाईक व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, उत्पादनवाढ, शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, फलोत्पादन आणि कृषी विस्तार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. कृषी क्षेत्रातील उत्कृष्टतेचा सन्मान करून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणे हा या पुरस्कारांचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यानपंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार(सर्वसाधारण गट/आदिवासी गट ) तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार (आयुक्तालय/मंत्रालय स्तर) या विविध पुरस्कारांचा समावेश आहे. राज्यभरातील पुरस्कारार्थी, त्यांचे कुटुंबीय, कृषी अधिकारी, कृषी तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून महाराष्ट्राच्या कृषी विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या कृषी क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा हा सन्मान सोहळा ठरणार आहे.

About Editor

Check Also

दत्तात्रय भरणे यांची माहिती, प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठीचा प्रस्ताव केंद्राला पाठवणार फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानी भरपाई मिळवून देण्यासाठी वेदर स्टेशन

फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात ‘वेदर स्टेशन’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *