मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा संपूर्ण शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर, राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट मोडवर असल्याचे मुख्यमंत्री यांचे विधानसभेत निवेदन

राज्यातील अतिवृष्टी आणि बदलत्या नैसर्गिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले.

विधानसभेत राज्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत माहिती देताना मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हवामानातील बदलामुळे निर्माण होणाऱ्या अतिवृष्टी, दरडी कोसळणे आणि जोरदार वाऱ्यासारख्या घटना या निसर्गाच्या बदललेल्या चक्राचा भाग आहेत. अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासनाने पूर्वतयारी केली असली तरी काही वेळा अपेक्षेपेक्षा वेगळ्या घटना घडतात. मात्र अशा प्रत्येक परिस्थितीत महानगरपालिका, राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित सर्व विभाग रस्त्यावर उतरून तातडीने मदतकार्य करत आहे असे सांगितले.

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत धोकादायक ठिकाणी त्वरित वाहतूक वळविणे, रस्ते बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणणे तसेच पाण्यात अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असल्याची माहिती दिली.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, संभाव्य धोका लक्षात घेऊन गेल्या दोन दिवसांत धोकादायक भागांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून त्यांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून दुपारनंतर राज्यातील काही भागांत जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, शक्यतो प्रवास टाळावा आणि कोणत्याही परिस्थितीत अनावश्यक बाहेर पडू नये असे आवाहनही यावेळी केले.

विशेषतः तरुणांना आवाहन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पावसाळी पर्यटन, धबधबे, घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी जाणे पूर्णपणे टाळावे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्य शासनाचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नियमित आढावा घेतला जात आहे. सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही ठिकाणी यंत्रणेत कमतरता राहणार नाही आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील, असा विश्वासही व्यक्त केला.

तसेच, गेल्या दोन-तीन दिवसांतील घटनांबाबत, करण्यात आलेल्या मदतकार्याबाबत आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर निवेदन उद्या सादर करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवेदनानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करत मियमित कामकाज उद्या सकाळी ११ वाजल्यापासून होणार असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा सवाल, अक्कल शिकवू नये; रस्त्यावर उतरून भाजपा नेत्यांनी काय ‘दिवे’ लावले ? मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये ‘पाण्यात’; मुंबईची ‘वाताहत’ होण्यास भाजपाच जबाबदार

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष मागील ३० वर्षांपासून सत्तेत आहे, यात २५ वर्षे शिवसेनेसोबतची युती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *