मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्रासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उड्डाण पुल राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण

राज्यातील नागरिकांना सुरक्षित कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करुन देतांनाच रेल्वे फाटका अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन वर्षात १४५ रेल्वे उडाण पुलाच्या बांधमांना प्राधान्य देण्यात येत असून रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

वर्धमाननगर येथे रेल्वे क्रॉसिंगवर चार पदरी रोड, ओवर ब्रिज तसेच राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉपोरेशन लिमिटेड [महारेल] यांनी विकसीत केलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते तर यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थराज्यमंत्री ॲङ आशिष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, चरणसिंग ठाकूर, महापौर श्रीमती निता ठाकरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी, महारेलचे महाव्यवस्थापक राजेशकुमार जयस्वाल, दयाशंकर तिवारी, महानगरपालिकेचे नगरसेवक, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रेल्वे फाटका अभावी दरवर्षी २१ हजार लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात ५२४ रेल्वे फाटकांची आवश्यकता असून त्यापैकी १० हजार पेक्षा जास्त दळणवळणातंर्गत असलेल्या फाटकासोबतच इतरही १४५ रेल्वेवरील पुलाच्या बांधकामाला मान्यता दिली असून हे संपूर्ण काम येत्या तीन वर्षात महारेल तर्फे पूर्ण करण्यात येणार आहे. रेल्वे प्रकल्पासंदर्भातील बांधकामासाठी महारेलची स्थापना केल्यामूळे पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूरसह मुंबईतील अतिशय कठीण पुलांच्या बांधकामांचे नियोजनबद्व काम जलद गतीने पूर्ण करण्यात आले आहे. महारेल्वेने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून यासाठी पेटेंटसुध्दा मिळविले आहे. कामाची गती व कमी खर्चात कामाचा दर्जा राखत पायाभूत सुविधांची कामे पूर्ण केल्याचा गौरव आपल्या भाषणात केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूर शहराच्या तसेच रस्त्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरु असल्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या असून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होत आहे. त्यामुळे सामाजिक व आर्थिक विकास होत असल्याचे सांगितले. तसेच भगवान संभनाथ चौक ते डिप्टी सिग्नल मार्ग या रेल्वे ओव्हर ब्रिजला माजी महापौर बाहरीनबाई सोनबोईर यांचे नाव देण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यानी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच पारडी येथील उड्डाण पुलाच्या सोबतच येथील व्यावसायीकांसाठी आधुनिक भाजी मार्केट तसेच स्पोर्ट क्लब बांधण्यात येणार असून या प्रकल्पाच्या १५० कोटी रुपयाच्या खर्चापैकी ४० कोटी रुपयाचा निधी एनएचआय तर्फे देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. पूर्व नागपूर परिसरात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्या असून कचऱ्‍यापासून सीएनजी निर्मितीचा प्रकल्प सुरु होत आहे. महारेल तर्फे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरु असून अत्यंत जलद गतीने पूर्ण होत आहे. मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरचा गौरव वाढल्याचेही यावेळी सांगितले.

यावेळी आमदार कृष्णा खोपडे यांनी विविध विकास कामांची माहिती दिली. महारेलचे महाव्यवस्थापक राजेशकुमार जयस्वाल यांनी महारेल तर्फे राज्यात सुरु असलेल्या विविध प्रकल्पाची माहिती दिली. यामध्ये अमरावती, सातारा, नाशिक , सांगली, नागपूर , चंद्रपूर जिल्ह्यातील तीन रोड ओव्हर ब्रिज ४ सबवे आणि एक रोड अंडरब्रिज या प्रकल्पाचा समावेश असल्याचा त्यांनी सांगितले. या प्रकल्पावर ४८४ कोटी रुपये खर्च झाला असून नागपूर येथील दोन प्रकल्प केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधाअंतर्गत पूर्ण करण्यात आले आहे. सात प्रकल्प रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या ५०:५० खर्च वाटपाच्या तत्वावर पूर्ण करण्यात आले आहे. जितेंद्रकुमार शर्मा यांनी आभार मानले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, एमपीएससीची ऑनलाईन परिक्षा पद्धत तातडीने रद्द करा नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा

मध्य प्रदेशात व्यापम नोकर भरती घोटाळा झाला होता, परंतु आपल्याकडील एमपीएससी (MPSC) नोकर भरतीचा घोटाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *